सोलापूर : लक्ष्मी सहकारी बँकेतील पाच लाखांच्या आतील १२ हजार ९०० विमापात्र ठेवीदारांच्या खात्यात बुधवारी १४४ कोटी रुपये ठेवी विमा रक्कम जमा झाले आहे. उर्वरित ठेवीदारांच्या खात्यात गुरुवार सायंकाळपर्यंत एकूण १८६ कोटी रुपये विमा रक्कम जमा होईल. डिपॉझिट इन्शुरन्स ॲन्ड क्रेडिट गॅरेंटी काॅर्पोरेशन अर्थात ठेवी विमा आणि पत हमी महामंडळाकडून विमापात्र रक्कम जमा झाल्याची माहिती बँकेचे प्रशासक तथा शहर उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांनी दिली आहे.
रोखीचा तुटवडा निर्माण झाल्याने लक्ष्मी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने १३ नोव्हेंबर रोजी प्रशासकाची नियुक्ती केली. त्यानंतर विमापात्र रक्कम मिळवण्यासाठी प्रशासक नागनाथ कंजेरी यांनी पहिल्या टप्प्यात पंचेचाळीस दिवसांचा कार्यक्रम राबविला. पहिल्या टप्प्यात पाच लाखांच्या आतील १६ हजार ४०५ ठेवीदारांनी क्लेम दाखल केले. यांपैकी बुधवारी १२ हजार ९०० ठेवीदारांच्या खात्यात १४४ कोटी विमा रक्कम जमा झाली आहे. काही तांत्रिक चुका राहिल्याने उर्वरित ठेवीदारांच्या खात्यात विमा रक्कम जमा झालेली नाही. आज, गुरुवारी तांत्रिक चुका दुरुस्तीचे काम होईल, अशी माहिती कंजेरी यांनी दिली.
बँकेवर प्रशासक आल्यानंतर २१६ कोटी ठेवी देणे बाकी होते. यातील २०२ कोटी ठेवी या पाच लाखांच्या आतील होत्या. यांना विमा संरक्षण असल्याने त्यांच्याकडून क्लेम दाखल करून घेतले. उर्वरित १४ कोटी ठेवी या पाच लाखांवरील आहेत. बँकेतील थकबाकीदारांकडून कर्जवसुली करून पाच लाखांवरील ठेवी परत करण्यात येणार आहेत.
प्रशासकांचे आभार अन् डोळ्यांत अश्रू
बुधवारी अनेक ठेवीदारांच्या खात्यात विमा रक्कम जमा झाली. त्यामुळे अनेक ठेवीदारांनी बँकेचे कार्यालय गाठून तसेच फोन करून प्रशासक नागनाथ कंजेरी यांचे आभार मानले. आभार व्यक्त करताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. बँकेवर प्रशासक आल्यानंतर बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळतील की नाही, याची चिंता ठेवीदारांना लागून राहिली होती. प्रशासकांनी ठेव महामंडळाकडे योग्य पाठपुरावा केल्याने विमापात्र ठेवी लवकर मिळाल्या, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.