सोलापूर : शहरातील नॉर्थकोट शाळेच्या मैदानावर शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलन होत आहे. या संमेलनासाठी भव्य अशा मंडपाची उभारणी केली आहे. एकावेळी साडेआठ हजार लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
नाट्यसंमेलनासाठी २५० फूट रुंदी आणि २८० फूट लांबीचा मांडव उभा करण्यात आला आहे तर ८० बाय ४० फूट इतका मोठा स्टेज तयार करण्यात येत आहे. एकावेळी साडेआठ हजार लोक बसून संमेलन पाहू शकतात असे नियोजन करण्यात आले आहे. पाऊस आल्यास संमेलनात अडथळा येऊ नये यासाठी जर्मन हँगिंग पद्धतीने वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहे. सोलापुरात बहुधा पहिल्यांदाच अशा पद्धतीचे मंडप उभारण्यात आले आहे. हे मंडप पुण्याहून मागविण्यात आले आहे.
नाट्यसंमेलनाच्या मंडपाची पाहणी स्वागताध्यक्ष, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. २० ते २८ दरम्यान होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद मुंबई मध्यवर्ती शाखेचे शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्यसंमेलन सोलापूरच्या नाट्यपरिषद शाखेकडून आयोजित करण्यात येत आहे. कार्यक्रम कुठे कसे करणे सोयीचे होईल आणि येणाऱ्या रसिक श्रोते तसेच कलावंतांना अडचण होणार नाही याची खबरदारी घेतली जावी यासाठी विविध सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.