सोलापूर : भरधाव वेगात निघालेल्या कंटेनर चालकाने रस्त्याच्या कडेला चारा खात उभारलेल्या मेंढ्यांना जोराची धडक दिली. या धडकेत पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला असून पाच मेंढ्या जखमी झाल्या आहेत. हा अपघात २८ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा घडला. याबाबत रविवार २९ ऑक्टोबर रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवन सोमनिंग सिनेवाडीकर (वय ३४, रा. मु.पाे. हत्तूर, ता.द.सोलापूर) यानी दिलेल्या फिर्यादीनुसार कंटेनर चालक खालिद शहाबुद्दीन पठाण (वय ४६, रा. साहबदीन सापनकी संपल, २२५ जि. पलवाल, राज्य - हरियाणा) याच्याविरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, जीवन सिनेवाडीकर हे विजयपूर हायवेवरील विश्वंभर लकडे यांच्या शेतासमोर मेंढ्या चरत होते. याचवेळी भरधाव वेगात आलेल्या आर जे १४ जीएच ७७४० च्या चालक खालिद पठाण याने रस्त्याच्या कडेला उभारलेल्या मेंढयांना जोराची धडक दिली.
या धडकेत पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला असून पाच मेंढ्या जखमी झाल्या आहेत. या अपघाताची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दाईंगडे हे करीत आहेत. मेंढपाळ जीवन सिनेवाडीकर यांनी रडत रडतच पोलिसांना अपघाताची माहिती दिली. मुक्या प्राण्यांवरही जीव लावणारी माणसं आजही जगात आहेत हेच यातून दिसून येते.