याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथून जीन्स कपड्याचे रोल घेऊन कंटेनर (जी. जे. २७ एक्स. ९७८८) हा बंगलोरकडे निघाला होता. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास पिंपरी परिसरामध्ये समोरून अचानक गाडी आल्याने कंटेनर बाजूला घेण्याच्या नादात कंटेनर रस्त्याच्या ाबाजूला उलटून अपघात झाला. त्यात जीन्स कपड्यांचे रोल होते. ते रोल दुसऱ्या गाडीमध्ये भरत असताना रात्री साडेनऊच्या सुमारास काही अनोळखी व्यक्तींनी अंधाराचा फायदा घेत कंटेनर चालक व मजुरांवर दगडफेक केली. त्यामुळे मजूर व चालक पळून गेले.
दरम्यान, दगडफेक करणाऱ्यांनी कपड्यांचे पॅकिंग असणारे प्रति २० हजार रुपये किमतीचे १० रोल असे एकूण दोन लाख रुपयांचे कपड्याचे रोल चोरून नेल्याची फिर्याद देवीदास जैसदास स्वामी (रा. जोगनिया, ता. रतनगड, राजस्थान) याने दिली होती. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने करीत आहेत.
तपासाची चक्रे फिरवून सहाजणांना अटक
पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी फिर्यादीनुसार तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा यात श्रीपत पिंपरी येथील चोरट्यांचा सुगावा लागला. कपड्याचे रोल चोरून नेणारे हेच असल्याचे तपासात पुढे आले. त्यानुसार अमोल सिद्धाराम वाघमोडे, दिनकर उत्तम वाघमोडे, शंकर बापूराव वाघमोडे, अक्षय सुनील माने, भैया भास्कर वाघमोडे, धनाजी बापूराव वाघमोडे या सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेले कपड्यांचे रोल जप्त केले. या सर्वांना न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.