पंढरपूर : चंद्रभागा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी नदीमध्ये वाहने धुणे, कपडे, जनावरे धुणे, मूर्ती विसर्जन करणे, शौचास बसण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध केले आहे़ मात्र नदीपात्रात राजरोसपणे वाहने धुतली जातात़ परिणामी त्यांच्याकडून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याचे दिसून येते़ असे प्रकार भरदिवसा होत असताना नगरपरिषद प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते.
शनिवारी सकाळी १० च्या सुमारास पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाºया बंधाºयाच्या खालील बाजूस चंद्रभागा नदीत चक्क जेसीबी, ट्रॅक्टर, रिक्षा, मोटरसायकली धुतल्या जात होत्या़ वाहने धुण्याचे काम दुपारी १२ वाजेपर्यंत सुरुच होते़ त्याप्रमाणे म्हशीसह अन्य जनावरे तर नित्यनियमाने धुतली जातात़ शहरातील महिलाही धुणे धुण्यासाठी चंद्रभागेत जातात. साबण, निरम्याचे पाणी पात्रात मिसळल्याने प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता असते. हे नित्यनियमाने घडत असताना मात्र त्यांचे नगरपरिषद प्रशासन काहीच कारवाई करताना दिसून येत नाही.
चंद्रभागा वाळवंटात जलसंपदा विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसाऱ़़, नगरपरिषदेने जाहीर सूचना या नावाने फलक लावले आहेत़ मात्र हे फलक केवळ शोसाठीच असल्याचे दिसून येतात़ मात्र या फलकावरील सूचना वाचून त्याची कोणीही अंमलबजावणी करताना दिसून येत नाही़ ज्या नगरपरिषदेने हे फलक लावले आहेत त्यांनीही संबंधित वाहनधारक, पशुपालकांवर कोणतीही कारवाई केलेली दिसून येत नाही़ परिणामी यावर शंका व्यक्त केली जात आहे.
भाविकांच्या आरोग्याला धोका...- चंद्रभागा नदी पात्रात पाण्यात नेऊन वाहने उभी केली जातात़ त्यानंतर वाहनांवर पाणी शिंपडले जाते़ या पाण्याच्या माºयामुळे वाहनाचे डिझेल, पेट्रोल पाण्यात मिसळून पाण्यावर तरंगताना दिसतात़ ते पाणी खाली पुंडलिक मंदिर परिसरात येते़ या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून आलेले भाविक पवित्र चंद्रभागा म्हणून स्नान करतात़ पाण्यात डुबकी मारतात़ परंतु इंधनमिश्रित या पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे़