सोलापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राज्याच्या विविध भागातील वातावरण मंगळवारी दिवसभर तणावपूर्ण होते. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगाराने बसची वाहतूक बंद ठेवली. यामुळे पंढरपुरात थांबलेल्या वारकºयांचे हाल होण्याची चिन्हे दिसून लागली. परंतु, सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आगारप्रमुख विवेक हिप्पळगावकर यांची भेट घेऊन वारकºयांच्या सोयीसाठी वाहतूक सुरु करण्याची विनंती केली. यानंतर एसटी बसची वाहतूक सुरु झाली.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरुन सोमवारी मराठवाड्यातील काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. त्यामुळे मराठा संघटनांनी मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. पंढरपुरात आषाढी एकादशीसाठी आलेले वारकरी अद्यापही तिथेच थांबून आहेत. ते जोपर्यंत घरी जात नाहीत तोपर्यंत सोलापूर जिल्हा बंदमध्ये सहभागी होणार नाही, असा निर्णय पंढरपूर, सोलापूर येथील सकल मराठा समाजाने जाहीर केला होता.
राज्यातील वातावरण तापल्याने एसटी महामंडळाच्या आगाराने वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट समजल्यानंतर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, रवी मोहिते, सुहास कदम, भाऊ रोडगे, गणेश डोंगरे, दत्ता भोसले, सोमनाथ चव्हाण यांनी सोलापूर आगार प्रमुखांची भेट घेतली. बार्शी, करमाळ्यासह विविध भागातील समाज बांधवांशी संपर्क केला. आम्हाला वारकºयांची काळजी आहे. त्यांना त्रास होईल असा प्रकार आमच्याकडून होणार नाही. त्यामुळे तुम्ही बसची वाहतूक सुरु करा, अशी विनंती केली. यादरम्यान, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, करमाळ्याचे विलास घुमरे आदींनी दूरध्वनीवरुन वातवरण निवळ्याची हमी दिली. त्यामुळे एसटीची वाहतूक सुरु झाली.
सलोख्यासाठी प्रयत्न सुरु- मराठा क्रांती मोर्चे सुरु झाल्यानंतर राज्यातील काही भागात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बहुजन समाजातील विविध संघटनांना एकत्र करुन सलोखा जपण्याचा प्रयत्न केला.
प्रक्षोभक वक्तव्ये करणाºयांना समज दिली. दलित, ओबसी, मुस्लिम संघटनांच्या मदतीने सलोख्यासाठी उपक्रम राबविले. हीच परंपरा गेल्या आठ दिवसांपासून जपली जात आहे. सकल मराठा समाज, मराठा सेवा संघ, संंभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा समिती, नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते विविध भागातील समाज बांधवांशी संपर्क करुन शांततेच्या मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा आग्रह करीत आहेत.