शासनाकडून पूर्वीच्या तुलनेत फारच कमी अनुदान मिळत असल्याने गॅस मागणीला याचाही फटका बसला आहे.
अक्कलकोट तालुक्यात स्टेशन रोडवर मेहता एंटरप्राइजेस भारत गॅस एजन्सी आहे. त्यांचे अक्कलकोट व दक्षिण तालुक्यात मिळून ३९ हजार ग्राहक आहेत. त्यापैकी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री गॅस उज्वला योजनेमधून ६ हजार ५०० लाभार्थी आहेत. तीन महिन्यांत सतत होणाऱ्या गॅस दरवाढीमुळे तब्बल ३ हजारांपेक्षा जास्त ग्राहकांनी गॅस घेणे बंद केले आहे.
तसेच एच.पी. गॅस एजन्सीकडे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुका मिळून ३० हजार ग्राहक आहेत. त्यापैकी १७ हजार ग्राहक प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेशी जोडले गेले आहेत. यांच्याकडेही गॅस दरवाढीमुळे ४ हजारांपेक्षा जास्त ग्राहक गॅस घेण्यास नकार देत आहेत. दोन्ही एजन्सीकडे ग्राहक संख्या रोडवली असून नवीन कनेक्शन घेण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.
ग्रामीण भागातील ग्राहक पर्यायी इंधन म्हणून तुरीची लाकडे, शेतातील झाडांच्या वाळलेले फांद्या, गोवऱ्या, अशा विविध प्रकारचे मोफत मिळणाऱ्या इंधनाकडे वळालेले आहेत. एकीकडे अतिवृष्टी, महापूर येऊन यावर्षी शेतकरी संकटात सापडलेले आहेत. त्यातच दुसरीकडे गॅस दरवाढ कमी होताना दिसत नाही. त्यामुळे काही महिने गॅस घेणे बंद केलेले सोयीचे आहे, असे ग्राहकांनी सांगितले. सध्या दोन दोन ते तीन महिन्यांपासून गॅस टाक्या घरात एका कोपऱ्यात धूळ खात पडून आहेत.
अनुदानच्या रकमेतही घट
पूर्वी १५० ते २०० रुपये एका गॅस टाकीमागे ग्राहकांना अनुदान मिळत होते. आता झपाट्याने गॅस दर वाढत होत असताना केवळ १ रुपये ३७ पैसे मार्च महिन्याचे तर फेब्रुवारी महिन्याचे १ रुपये ८० पैसे अनुदान मिळाले आहेत. पूर्वी एका गॅस टाकीचे किंमत ६०१ रुपये होते तर आता ८२७ इतके रुपये झाली आहे. मागील दोन महिन्यात टप्याटप्याने प्रति टाकीच्या मागे २०० रुपये वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे टाक्या कोपऱ्यात धूळखात पडून आहेत.
कोट ::::::::
मागील ५० वर्षात झाले नाही तेवढे मागील तीन वर्षात प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेमधून नव्याने ग्राहक जोडले गेले. देशात त्याची संख्या ९ कोटीच्या आसपास आहे. अनेक गोरगरिबांना मोफत लाभ मिळाला. ही योजना व्यवस्थितपणे खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहचली. कोरोनाच्या काळात तीन टाक्याची रक्कम शासनाने ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली आहे. असे अनेक निर्णय योग्य असले तरी दरवाढीमुळे दोन महिन्यांपासून काही ग्राहक गॅस घेऊन जाणे बंद केले आहे.
- प्रमोद कोरे,
गॅस वितरक, समर्थ गॅस एजन्सी.
कोट ::::::
मी रोज मजुरी करीत असते. यामुळे माझे एकूण उत्पन्न कमी आहे. शासनाकडून मागील काही महिन्यांपूर्वी मोफत गॅस मिळाला, मात्र तेव्हा कमी रक्कमेत टाकी मिळत होती. आता त्याची किंमत वाढली आहे. त्यामुळे ती मला परवडेना. म्हणून मी गॅस घेणे बंद केले आहे.
- मल्लम्मा भंडारे, ग्राहक, बोरी उमरगे