सोलापूर : महापालिकेने अधिगृहित केलेल्या खासगी विहिरीतील पाणी जाते कोठे असा सवाल उपस्थित केल्यावर मंड्या व उद्यान सभापती फिरदोस पटेल व राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे यांच्यात वादावादी झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी जनवात्सल्यजवळ घडला. फिरदोस पटेल यांनी २३ जानेवारी रोजी आयुक्त गुडेवार यांच्याकडे मनपात अधिगृहित केलेल्या विहिरीचे पाणी जाते कोठे अशी तक्रार केली होती. आयुक्तांनी हा अर्ज चौकशीसाठी सार्वजनिक आरोग्य अभियंता अंबऋषी रोडे यांच्याकडे दिला होता. यावरून कोल्हे यांनी आज सकाळी पटेल यांना फोन करून माझ्याविरुद्ध तक्रार करता, शिंदे साहेबांकडे या असे सुनावले. त्यामुळे पटेल या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भेटण्यासाठी जनवात्सल्यवर आल्या.पोर्चमध्ये महापौर सुशीला आबुटे, सुधीर खरटमल भेटले. त्यांच्याशी बोलत असतानाच कोल्हे आतून आले. त्यांनी पटेल यांना तक्रार अर्जाची छायांकित प्रत दाखवित मलाही तुमच्या महिला व बालकल्याण विभागातील भानगडी काढाव्या लागतील. माझ्याविरुद्ध तक्रारी करता, हा प्रश्न आता आमच्या पक्ष बैठकीत मांडतो असे सुनावले. यावरून दोघात खडाजंगी झाली. त्यानंतर सायंकाळी पटेल यांनी गुडेवार यांची भेट घेऊन तक्रार केलेला अर्ज दुसरीकडे गेलाच कसा असा सवाल उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य अभियंत्याची चौकशी सुरू केली आहे. पटेल यांच्या तक्रारीनुसार सन २0१२ मध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्यावर शहरातील ११ विहिरी अधिगृहित करण्यात आल्या. या विहिरीतील पाणी वापरण्यासाठी दीड कोटीचा डीपीआर तयार करण्यात आला. विहिरीतील गाळ काढून फिल्टर प्लान्ट बसवून पाणीपुरवठय़ाचा ठेका देण्यात आला. ठेकेदाराने अर्धवट काम करून ६४ लाख उकळले. यातून प्रभार २८ ब मधील जुनी लक्ष्मी मिल चाळ येथील विहिरीचा गाळ काढून योजना सुरू केली. पण ही योजना महापालिकेच्या ताब्यात नाही. खासगी वितरणासाठी पाणी विक्री होत आहे. यासाठी किती खर्च झाला, कोणी केला व मक्ता रद्द की चालू याबाबत माहिती मिळविण्यासाठी पटेल यांनी अर्ज दिला होता. या अर्जावर सार्वजनिक आरोग्य विभागाने माहिती न देता दुसर्यांना छायांकित प्रत पुरविली. ही बाब गंभीर असल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
विहिरीवरून कोल्हे-पटेल यांच्यात वादावादी
By admin | Published: February 03, 2015 5:35 PM