या मुद्द्यांवर चर्चा व्हावी, असे त्यांचे म्हणणे असताना काही संचालकांनी पुढच्या बैठकीत बघू, असे म्हणत या मुद्द्यांना बगल देण्याचा प्रयत्न केला. सध्या चालू गळीत हंगामातील शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिले आहेत. त्याबाबत काय भूमिका, असाही प्रश्न उपस्थित होताच भगीरथ भालके यांनी सर्वच्या सर्व गाळप झालेल्या उसाचे बिल देण्याचे नियोजन केले आहे. त्याबाबत कुणीही काळजी करू नये, असे ठामपणे सांगितले. त्यावर तसे असेल, तर अध्यक्षांसह सर्व संचालकांचे अभिनंदन करू, असे युवराज पाटील म्हणाले.
बैठक आटोपल्यानंतर अध्यक्ष भगीरथ भालके यांनी आपल्यातीलच काही जण तक्रारी करून गैरसमज निर्माण करत असल्याचा मुद्दा उपस्थित करताच युवराज पाटील यांनी स्वत:हून मीच माझ्या नावाने तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे इतरांची नावे घेण्याचा प्रश्न नसल्याचे सांगितले. कारखान्याकडून सभासदांचे, कामगार, ट्रॅक्टरमालकांची देणी द्यावीत, एवढी एकमेव मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. यावर इतर संचालकांनी दोघांनाही सांगत शांत करण्याचा प्रयत्न केला.
भगीरथ भालके यांना घेण्याचा प्रयत्न
आ. भारत भालके हयात असताना सलग १८ वर्षे चेअरमन असताना संचालक मंडळात कोणीही त्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस केले नाही. मात्र, त्यांच्या निधनानंतर भगीरथ भालके यांना मात्र विद्यमान संचालक मंडळातील काही संचालक विविध प्रश्न उपस्थित करून धारेवर धरण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. मग कधी ते कोअर कमिटी विश्वासात घेत नसल्याचे कारण असो, की बैठकीला बोलविले जात नसल्याचे कारण असो. शिवाय कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने शेतकऱ्यांची थकीत देणी, आरआरसी कारवाई यावरून घेण्याचा प्रयत्न असताना विद्यमान अध्यक्ष भगीरथ भालके मात्र चतुराईने या संचालकांना उत्तरे देत आपण सक्षम असल्याचे दाखवून देत आहेत.
बैठकीत इतर वादाचे पडसाद
भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पदाधिकारी व भालके समर्थकांमध्ये मतभेद आहेत. यावरूनच गेल्या महिन्यात राष्ट्रवादीच्या काही जुन्या पदाधिकाऱ्यांना वगळून नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्याचे नाराजीनाट्य संपले नसताना संचालक मंडळात काही गोष्टींवरून उघड मतभेद असल्याने उभी फूट पडली आहे. त्याचे पडसाद साखर कारखान्याच्या बैठकीत उमटले. याची सभासदांमध्ये वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.