मोहोळ : दत्तनगर भागात राहणाऱ्या भटक्या समाजांच्या वस्तीत एक नव्हे अनेक समस्यांनी इथले नागिरक हैराण आहेत. या नेहमीच्या मनस्तापाला कंटाळून आपली सोयी सुविधा मिळाव्या यासाठी दररोजची रोजीरोटी बुडवून मोहोळ नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
भटक्या समाजाचे वास्तव्य असलेल्या या वस्तीत रस्ते खराब झाले आहेत. पावसाचे पाणी झोपड्यांमध्ये थांबते. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरातील रस्ता तातडीने दुरुस्त करावा व इतर सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून आदिवासी समाज व भटके - विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या वतीने नगर परिषदेसमोर आबालवृद्धांसह बांधवांनी दिवसभराचा रोजगार बुडवून धरणे आंदोलन केले.
मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक १३मध्ये दत्तनगर परिसरात १५० लोक गेल्या ४० वर्षांपासून झोपडपट्टीमध्ये राहात आहेत. गेल्या ५ वर्षांत शहरात अनेक ठिकाणी रस्ते करण्यात झाले. परंतु या परिसरातील रस्ता झालेला नाही. जुना रस्ता अत्यंत खराब व खड्डे झाल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पाणी जाण्यासाठी गटार नसल्यामुळे घाण पाणी घरात शिरत आहे. पर्यायाने लहान मुले व वृद्धांना साथीच्या रोगांना तोंड द्यावे लागत आहे.
वेळोवेळी नगर परिषदेकडे याबाबत पाठपुरावा करूनही लक्ष न दिल्याने वैतागलेल्या समाजाने येथील रस्ता तत्काळ दुरुस्त करून येथे पिण्याच्या पाण्याच्या नळाचे कनेक्शन द्यावे, वस्तीमधील सर्व कुटुंबांसाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी भारतमाता आदिवासी समाज व भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी विजया भोसले, कुसुम भोसले, अनुप काळे, जीवा चव्हाण, सुभाष पवार, उत्तम पवार, किसन सितारे, वैशाली चव्हाण, मीनाक्षी पवार, छाया चव्हाण, कांता चव्हाण, शालन चव्हाण, दीपाली चव्हाण आदींसह महिला लहान - मोठ्या मुलांसह उपस्थित होत्या.
---
सेवासुविधा देण्याची ग्वाही
दरम्यान, या रस्त्याची तांत्रिक मान्यता मिळण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाईल. यासह इतर सोयीसुविधांसाठी दोन दिवसात पाहणी करून कार्यवाही करण्याचे पत्र मोहोळ नगर परिषदेच्या अधिकारी सुवर्णा हाके यांनी दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.
---
फोटो : २० मोहाेळ १ २० मोहोळ २ फोटो : १ ... भटका समाज वस्ती परिसरातील घाणीचे साम्राज्य.
नगर परिषदेसमोर उपोषणास बसलेला भटका समाज.