पंढरपूर, दि. 17 - कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील पुराव्याचे संपूर्ण काम संपले आहे़ त्यामुळे ११ आक्टोबरपासून अंतिम युक्तीवाद सुरु होईल़ त्यानंतर लवकरच निकाल लागेल, असा विश्वास या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला. पंढरपूर येथे खाजगी कामानिमित्त आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोपर्डी प्रकरणातील आरोपींच्या बचाव साक्षीदाराची सरकारच्या बाजुची उलट तपासणी पूर्ण झाली आहे. या तपासणीत बचाव साक्षीदाराने कोपर्डी अत्याचाराविरोधात निघालेल्या मराठा मोर्चातील मागण्यांना आपला कोणतीही विरोध नसल्याचे कबूल केले आहे, असा गौप्यस्फोट उज्ज्वल निकम यांनी केला. त्यामुळे बचाव पक्षाच्या साक्षीदारानेच आरोपींना मराठी मोर्चातील फाशीच्या मागणीला विरोध नसल्याचे यावरुन दिसून येतेे.
कोपर्डी प्रकरणाचा निकाल लागण्यास उशीर झाल्याचे मान्य करून उज्ज्वल निकम म्हणाले, मात्र अशा संवेदनशील प्रकरणामध्ये कोणामुळे उशीर होतो याचे आॅडीट होणे गरजेचे आहे़ तसे झाल्यास न्याय लवकर मिळेल आणि जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वाढेल़ तसेच ज्यांनी विलंब केला त्यांना त्याचे कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, याची तरतूद करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पाकिस्तानने केला न्यायालयाचा अपमान
भारतीय नौसेनेचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताने फाशीची शिक्षा सुनावली, मात्र या निकालावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली़ त्यानंतरही पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना आणि भारत सरकारच्या प्रतिनिधीला त्यांना भेटू दिले नाही. यावरून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अपमान करीत आहे, असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले़