सोलापूर : पत्रकारांचा मूळ पिंड हा शिक्षकाचाच आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, आगरकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत पत्रकारितेत झालेले बदल समाजाने अनुभवले आहेत. प्रिंट मीडियानंतर इलेक्ट्रॉनिक आणि आता डिजिटल पत्रकारिता झाली आहे. शहीद कुर्बान हुसेन यांच्यापासून साेलापुरात पत्रकारांची परंपरा आहे. ती पुढे कायम राहिली असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला, यावेळी शिंदे बाेलत होते. व्यासपीठावर महापौर श्रीकांचना यन्नम, मनपाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, कांचन फाउंडेशनचे सुदीप चाकोते आणि श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, कोरोनाकाळात पत्रकारांनी खूप कठिण काम केले आहे. देशपातळीच्या राजकारणात काही पत्रकार पत्रकारितेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र साेलापूरची पत्रकारिता तशी नाही. पत्रकारितेमध्येही खूप कष्ट घ्यावे लागते, असे कष्टाळू पत्रकार साेलापुरात असल्याचे कौतुकोद्गार काढत शिक्षक हा विद्यार्थी घडवत असतो आणि पत्रकार हा समाज घडवत असतो, असे ते म्हणाले.
सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले, तर आभार विजयकुमार राजापुरे यांनी मानले.