सोलापूर : कोरोनाने अनेकांना विधवा केले, तर अनेकांना अनाथ बनवले. कोरोनाच्या धक्क्यातून सावरत असताना आता रस्ते अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. सोलापूर शहरात सहा महिन्यातच २१ जणांना आपला जीव गमवावा लागला. यात एका कुटुंबीयांना आपला एकुलता एक मुलगाही गमवावा लागला. तसेच दुसऱ्या अपघातात तीन मुलांनी आपला पिता गमावला.
लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतूक जवळपास बंद असल्यामुळे अपघातांचे प्रमाण शून्यावर गेले होते. पण जसजसे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आणि गर्दी वाढू लागली, त्यातच सोलापुरात विविध ठिकाणी खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे कोरोनानंतर आता रस्ते अपघातात यमराज नागरिकांच्या समोर उभे आहेत.
मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यातच २१ प्राणांतिक अपघात झालेले आहेत. मागीलवर्षी ही संख्या ३५ होती. तसेच यंदा सतरा गंभीर अपघातात २४ जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये तरुणांची संख्या जास्त
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांतील ज्येष्ठ व्यक्ती या घरातच राहत असून त्यांची कामे करण्यासाठी घरातील तरुण व्यक्ती बाहेर पडत आहेत. त्यातच व्यवसायासाठी असलेल्या निर्बंधांमुळे होणाऱ्या घाईगडबडीत अपघात होत आहेत. यात तरुणांची संख्या जास्त आहे.
दुचाकी स्लिप होण्याचे वाढले प्रकार
शहरातील अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आलेले आहेत. यामुळे शहरात दुचाकी स्लिप होण्याचा धोका वाढला आहे. अनेक चौकात वळणावर माती जास्त असल्यामुळे तेथेही दुचाकी स्लिप होण्याचे प्रकार वाढले आहेत.
या ठिकाणी वाहने हळू चालवा...
- * विजापूर रोडवरील कंबर तलाव येथे ब्लॅक स्पॉट मानला जातो. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. यामुळे या मार्गावर असताना वाहने हळू चालवावीत.
- * मद्दी वस्ती पुलाजवळील स्पीड ब्रेकरजवळ अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. येथे मागील आठवड्यात एका कालच्या अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले होते.
- * मार्केट यार्डसमोरील चौकात जलवाहतुकीच्या वर्दळीमुळे नेहमी अपघात होत असतात. या ठिकाणी वाहने हळू चालवावीत.
- * शेळगी पुलावर रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेची काळजी घेतली नसल्यामुळे दुचाकी घसरून गुळवंची येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता, असा आरोप करत त्या गावकऱ्यांनी आंदोलन केले होते.
लॉकडाऊनमध्ये अपघातांची संख्या झाली कमी
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस बांधव आणि प्रशासनातील कर्मचारी वगळता इतर कोणताही नागरिक घराबाहेर पडू शकत नसल्यामुळे त्या काळातील अपघातांची संख्या शून्यावर आली होती. सोबतच या काळात वाहनांची रहदारी रस्त्यावर कमी झाल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले होते.