मुंबई सीटीबस विभागात कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे बेस्ट व महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ यांच्यात झालेल्या करारानुसार राज्यातील इतर डेपोप्रमाणे अक्कलकोट येथील डेपोचे ८ चालक, ८ वाहक असे १६ जण १० दिवसांपूर्वी मुंबई येथे नोकरीसाठी गेले होते. तेथे बसमध्ये गर्दी होती. त्यामुळे अक्कलकोट आगाराचे चालक चंद्रकांत रेड्डी रा.सांगवी बु. यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ते अक्कलकोट कारंजा चौकातील एका खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतले होते. मात्र कोरोना टेस्ट केले नाही. आजार बळावत गेल्याने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, तेथे तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह निघाले. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
रेड्डी कुटुंबावर आलेल्या संकटात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, सुरेश सूर्यवंशी, कामगार संघटनेचे अध्यक्ष अंबणा कोळी, स्थानक प्रमुख चव्हाण, नियंत्रक संभाजी पवार, मदन घाटगे, नामदेव कोळी, सुधाकर बोकडे, श्रीमंत खसगी यांच्यासह इंटक, कामगार सेना, कास्त्राईब संघटनेचे पदाधिका-यांनी भेट घेतली. डेपो मॅनेजर रमेश मंता यांच्याकडे निवेदनाद्वारे रेड्डी कुटुंबियाना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सेवेत सामावून घ्यावे, यापुढे मुंबई येथे कर्मचाऱ्यांना पाठवू नये अशी मागणी केली.