अक्कलकोट शहर त तालुक्यात बऱ्याच गावांत कोरोनाने एन्ट्री केली आहे. काही गावांतील परिस्थिती चिंताजनक आहे. अशा गावांची माहिती जाणून घेतली असता, काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामुळे तहसीलदार अंजली मरोड यांनी गेल्या तीन दिवसांपासून या गावांना भेटी देऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यांच्याबरोबर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे, विस्तार अधिकारी महेश भोरे, ज्या त्या गावचे तलाठी, ग्रामसेवक उपस्थित राहत आहेत.
कोणीही घाबरण्याचे कारण नाही. अक्कलकोट शहरात कोरोनावरील उपचारासाठी मोफत हॉस्पिटल सुरू केले आहे. मात्र, प्रत्येकांनी मास्क, सॅनिटायझर, शारीरिक आंतर या गोष्टी पाळल्या पाहिजेत. विनाकारण शहरात येणे, गावात कट्ट्यावर एकत्रित बसणे, विशेषत: तरुणवर्ग मोबाइल चॅटिंग करीत एकत्रपणे गप्पा मारण्याचे प्रमाण वाढले आहे, हे टाळावे. त्यासाठी पालकांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन मरोड यांनी केले आहे.
-----