सोलापूर : कोरोना लॉकडाऊनमध्ये बोटांवर मोजण्याइतके ट्रक धावत असले तरी शहरातील ३० हजार मालवाहतूक वाहनांना गेल्या अडीच महिन्यांपासून ब्रेक लागलेला आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोटार मालक संघ प्रयत्न करीत असताना जिल्हाधिकाºयांनी मात्र अद्याप त्यांना वेळ दिलेला नाही. यामुळे वाहनांच्या मालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
सोलापुरात औद्योगिक वसाहती स्थापन होण्यापूर्वी येथे मालवाहतुकीचे जाळे व्यापक झालेले होते. शहरातील ३५ हजार वाहनांपैकी केवळ पाच हजार वाहने जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी सुरू आहेत. काही वाहने सिमेंट वाहतुकीसाठी सुरू आहेत. शहरात वस्त्रोद्योग आणि विडी उद्योग मोठा असल्याने दररोज या उद्योगाच्या मालवाहतुकीसाठी शंभर ट्रक्सचा वापर होत असे. पण कोरोनामुळे सारेच थांबलेले आहे. या स्थितीत हा व्यवसाय भविष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जाणार आहे.
मोटार मालक संघाच्या चिंतेत वाढ- लॉकडाऊननंतर या व्यवसायाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांकडे जाऊन मोटार मालक संघाचे शिष्टमंडळ भेटले. पण, स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाºयांच्या चर्चेशिवाय आणि त्यांच्या हालचालीशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, अशी स्थिती आहे. शहरातील गोडावून, गॅरेज, टायर दुकाने आणि मालवाहतुकीला परवानगी दिल्याशिवाय परिस्थिती पूर्वपदावर येणार नाही. ही परवानगी मिळावी म्हणून मोटार मालक संघाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे.
आज वाहतूक बंद असली तरी इन्शुरन्सपासून ते अनेक प्रकारचे कर मोटार मालक भरतोय. चालक, हमाल आणि त्यांच्या कुटुंबीयांची भूकही भागवतोय. सर्व नियमांचं ओझं बाळगून राहणाºया मोटार मालकाची सध्या पिळवणूक सुरू आहे. जिल्हाधिकाºयांनी मोटार मालकांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा शेतकºयांनंतर मोटार मालकांच्या आत्महत्या होतील.- प्रकाश औसेकरसचिव, मोटार मालक संघ सोलापूर
‘ई-वे’ बिल भरावे लागते- सध्या वाहतूक बंद आहे. काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. या साºयांना ‘ई-वे’ बिल आॅनलाईन भरावे लागत आहे. याशिवाय वाहनाचे इन्शुरन्स, पार्किंगचे प्रत्येक वाहनाचे दोनशे रुपये, वाहन चालक आणि क्लीनर यांचा तीनशे रुपये आहार भत्ता मोटार मालकाला भरावा लागत आहे. सध्या वाहतूक बंद असतानाही मोटार मालकाला वेगवेगळ्या प्रकारचा खर्च भागवावा लागत आहे.