सोलापूर : दूध पावडर, बटरचे दर कमी झाले, पॅकिंग पिशवीची दूध विक्री ४० टक्क्याने घटली, मग दूध खरेदी दर कमी होणारच. २१ एप्रिलपासून गाईचा दूध खरेदी दर २५ रुपयांवर येईल. मात्र, काहीही झाले तरी २५ रुपयांपेक्षा कमी दर होणार नाही, हा माझा शब्द असल्याचे सोनाई दूध संघांचे अध्यक्ष तथा राज्य दुग्धविकास सल्लागार समितीचे सदस्य दशरथ माने यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे मागील एक वर्षभरापासून दूध विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. दूध पावडर व बटरचे दरही सातत्याने कमी-अधिक होत आहेत. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, हाॅटेल व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. उद्योग व्यवसायही बंद ठेवले जात आहेत. कोरोना वाढला की लोकांचे रोजगार बंद होत आहेत.
यामुळे शहरातील लोक आपापल्या गावी गेले आहेत व जात आहेत. यामुळे पिशवीबंद दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री कमालीची कमी झाली आहे. मग दूध खरेदी दरही घटणार हे सूत्रच आहे. खरेदी दर फेब्रुवारी महिन्यात प्रतिलिटर ३१ रुपयांवर गेला होता, तो सध्या २६ ते २८ रुपयांवर आला आहे. कोरोनाच्या परिणामाने लाॅकडाऊन होईल. त्यामुळे २१ एप्रिलपासून गाईचा दूध खरेदी दर प्रतिलिटर २५ रुपये करावा लागेल, असे सोनाई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी सांगितले.
सध्या बटर व दूध पावडरीचे दर फारच खाली आले असल्याने दूध खरेदी दर आणखी कमी होईल; मात्र २५ रुपयांपेक्षा कमी होणार नाही असा माझा शब्द असल्याचे राज्य दुग्धविकास सल्लागार समितीचे सदस्य माने म्हणाले.
दूध संघांचे दर
सोनाई दूध संघाने ११ एप्रिलपासून गाईचे दूध खरेदी प्रतिलिटर २८ रुपये ५० पैसे ( वाहतूक कमिशनसह) देण्यात येईल असे दरपत्रकाद्वारे कळविले आहे. कोयना व ममता दूध संघ शेतकऱ्यांना प्रतिलिटर २६ रुपये, नेचर प्रतिलिटर २७ रुपये व गोविंद प्रतिलिटर २८ रुपये दर देत आहे.
सरकारचा दूध संघांवर अंकुश राहिला नसल्याने खासगी संघ देतील ते किंवा ते ठरवतील त्याप्रमाणे दुधाला दर मिळत आहे. खासगी दूध संघ सोनाईच्या दशरथ माने यांचा निर्णय मानतात.
- संजय देशमुख, दूध उत्पादक शेतकरी