सोलापूर : कोरोनामुळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मृत पावलेल्या हगलूर (ता. उत्तर सोलापूर) येथील महिलेचे गावच्या स्मशानभूमीत दहन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या महिलेवर रुपाभवानी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्याची नोंद महापालिकेने केली आहे. प्रत्यक्षात पालिकेच्या यंत्रणेद्वारे एका सामाजिक संघटनेच्या मदतीने हा मृतदेह शववाहिकेत घालून हगलूरच्या दिशेने नेला; पण रस्त्याच्या मध्येच मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह महापालिकेच्या यंत्रणेकडून काढून घेत खासगी गाडीत घालून हगलूरच्या स्मशानभूमीत नेला अन् तेथेच दहन केल्याची चर्चा आज दिवसभर इंद्रभुवनाच्या प्रांगणात होती.
हगलूर येथील एका ५० वर्षीय महिलेला ७ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सायंकाळी ६.२० वाजता या महिलेचा मृत्यू झाला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी आणि त्यांचे पथक दुसºया दिवशी कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्यासाठी गावात पोहोचले. या महिलेच्या कुटुंबात दु:खाचे वातावरण होते. कुटुंबातील सदस्यांनी क्वारंटाईन होण्यास नकार दिला. यादरम्यान या महिलेवर गावातच अनेक नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाल्याचा प्रकार डॉक्टरांना समजला.
महिलेच्या मृत्यूची माहिती सिव्हिलकडून महापालिकेच्या आयडीएच हॉस्पिटलकडे पाठवण्यात आली होती. आयडीएच विभागातील नोंदीनुसार या महिलेचा मृतदेह शववाहिका चालक लांबतुरे आणि संघटनेच्या ताब्यात दिला. या महिलेवर रुपाभवानी जवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आयडीएच हॉस्पिटलमधील लिपिक उमेश वाघमारे यांनी केली आहे. प्रत्यक्षात या महिलेवर हगलूर गावात अंत्यसंस्कार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
यामुळे संशयाचे वातावरण
- - गेल्या चार महिन्यात पालिकेने अथवा झेडपीने कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार चार ते पाच व्यक्तींच्या उपस्थितीत मृत व्यक्तीच्या धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करावेत असे आदेश सरकारने दिले आहेत. याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. अंत्यसंस्कारावेळी महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाºयांची उपस्थिती बंधनकारक आहे, परंतु अलीकडच्या काळात पालिकेचे अधिकारी गायब असतात.
- - दरम्यान, हगलूर येथील महिलेचा मृतदेह स्मशानभूमीत ठेवून परत गेल्याचे शववाहिका चालक ज्ञानेश्वर लांबतुरे यांचे म्हणणे आहे. लिपिक वाघमारे यांनी तर या महिलेवर रुपाभवानीजवळील स्मशानभूमीत लाकडावर अंत्यसंस्कार झाल्याची बोगस नोंद करून ठेवली आहे. प्रत्यक्षात अंत्यसंस्कार झाले की नाही याबद्दलही आयडीएचमधील अधिकाºयांनी माहिती घेतलेली नाही.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये. दु:खद प्रसंगात नातेवाईकांवर नियंत्रण ठेवता येत नाही म्हणून काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोरोनाबाधित व्यक्तींवर अंत्यसंस्कार करावे असा नियम आहे. कोरोनामुळे औज, ता. दक्षिण सोलापूर येथील व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीवर औज गावात अंत्यसंस्कार केले होते; मात्र त्यासाठी महापालिका आयुक्तांची परवानगी घेतली होती. हगलूर प्रकरणात आयुक्तांची परवानगी घेणे अपेक्षित होते. परस्पर अंत्यसंस्कार झाले असतील तर प्रकरण गंभीर आहे.- बाबा मिस्त्री, नगरसेवक.
हगलूर येथील महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नव्हता. टायगर ग्रुपच्या सदस्यांकडून हगलूर गावातच महिलेवर अंत्यसंस्कार केले आहेत. हे करताना सर्व नियमांचे पालन करण्यात आल्याचे टायगर ग्रुप संस्थेचे म्हणणे आहे. याबद्दल अधिक चौकशी करु.- धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.