घेरडी येथील कोरोनामुळे मृत्यू पावलेले प्राथमिक शिक्षक प्रमोद माने व त्यांची मावशी जया घोरपडे या दोघांना रविकिरण कुलकर्णी यांनी उपचारासाठी मदत केली होती आणि नेमके त्यावेळेस त्यांनाही कोरोनाची बाधा झाली. प्रारंभी त्यांनी आठ दिवस घरीच उपचार घेतले, परंतु अधिक त्रास होऊ लागला, म्हणून नातेवाईक, शिक्षक मित्रांनी त्यांना सांगोल्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे ५ ते ७ दिवस उपचार केले, परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने, पुणे (पिंपरी चिंचवड) येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल केले. तेथेही गेली ८ ते ९ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर शनिवारी रविकिरण कुलकर्णी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सांगोला येथील आदर्श प्राथमिक शिक्षक समितीचे रविकिरण कुलकर्णी नेते होते. ते वाकी-घेरडीअंतर्गत मोटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होते. आदर्श शिक्षक समितीच्या संघटनात्मक कार्यात व सामाजिक चळवळीत त्यांचा नेहमी हिरिरीने सहभाग असायचा. प्राथमिक शिक्षक प्रमोद माने यांच्यानंतर दुसरे प्राथमिक शिक्षक रविकिरण कुलकर्णी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने, आदर्श शिक्षक समितीसह शिक्षक, पालक, ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.