सोलापूर : दीड वर्षापासून लांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच कोरोनामुळे पुन्हा मार्च २०२१ पर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने बुधवारी घेतला. त्यामुळे राज्यभरातील सुमारे ६४ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे.
२०१९ मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कामामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सतत निवडणुका पुन्हा-पुन्हा पुढे ढकलल्या होत्या. येत्या मार्चपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. माञ, शासनाने १६ जानेवारी रोजी निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश रद्द करीत निवडणुका सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे निवडणुका घेण्याची प्रक्रिया सहकार प्राधिकरणाने सुरू केली आहे.
अशातच राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट ओढावल्याने २४ फेब्रुवारी रोजीच्या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने बुधवारी घेतला आहे. त्यामुळे ज्या टप्प्यावर निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे त्या टप्प्यावर निवडणुका थांबविण्यात आल्या आहेत.