सोलापूर : शहर अन् जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोरोनाचा आजार कधी अन् केव्हा आपल्याला होईल, ही भीतीही प्रत्येक जण बाळगून आहेत. शरीरातील ऑक्सिजन कमी झाले की स्थिर आहे याविषयी जो-तो अॅलर्ट आहे. म्हणूनच खिशात सहजपणे बसेल असे पल्स ऑक्सिमीटरबरोबर दोस्ताना वाढला आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता आली असून, ऑक्सिमीटरची मागणी चांगलीच वाढली आहे.
ज्यांच्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत, ते आवर्जून पल्स ऑक्सिमीटर घरात ठेवत आहेत. डॉक्टरांबरोबरच, व्यापारी, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, महाविद्यालये, संस्था, कार्यालये, उद्योगधंदे आणि सर्वसामान्य नागरिकांमधूनही पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्याचे प्रमाण वाढत आहे. काही नागरिक बाहेर जातेवेळेस कायम खिशात पल्स ऑक्सिमीटर घेऊन फिरताना दिसत आहेत.कोरोना रुग्णाव्यतिरिक्त कोरोना नसलेले लोकही घरी तापमान आणि आॅक्सिजन स्तर मोजण्यासाठी पल्स आॅक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) या दोन्ही उपकरणांची खरेदी करीत आहेत. हे उपकरण कंपनीनुसार ७०० ते १००० रुपयांत बाजारात सहजरीत्या उपलब्ध आहे. याशिवाय थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) १५०० ते ३००० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. मागणीपेक्षा जास्त स्टॉक उपलब्ध आहेत.
असा होतो वापरव्यक्तीच्या शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे ९२ टक्क्यांपेक्षा जास्त दाखवत असेल तर कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही; मात्र ९२ किंवा ९० पेक्षा कमी असेल तर श्वसनाचा त्रास त्यांना संशयित समजलं जातं अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तर थर्मल स्कॅनरमध्ये तापमान ३५ ते ३७ असेल तर साधारण समजले जाते आणि ३८ ते ४० असेल तर उच्च तापमान असते. सध्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्येकाच्या घरी पल्स ऑक्सिमीटर असणे आवश्यक असे तज्ज्ञाचे मत आहे.