सोलापूर : कोरोना वॉर्डात काम करणाºया कर्मचाºयांचे संरक्षण, सुरक्षा व संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी आता ‘कोरोना फायटर रोबोट’ सज्ज झाला आहे. रोटरी क्लब सोलापूरने शासकीय रुग्णालयास असे दोन रोबोट देणगी म्हणून दिल्याची माहिती रोटरी क्लब सोलापूरचे अध्यक्ष बी. एस.मुंदडा यांनी दिली. या रोबोटसाठी रोटरी जिल्हा ३१३२ चे प्रांतपाल सुहास वैद्य यांचेही सहकार्य लाभल्याचे मुंदडा यांनी सांगितले.
या रोबोटचा लोकार्पण सोहळा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते तर वैशंपायन मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व माजी प्रांतपाल राजीव प्रधान, झुबीन अमारिआ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
कोरोनाच्या या लढ्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटल स्टाफ, पोलीस, सफाई कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत आहेत. या सर्वांच्या संरक्षणासाठी रोबोट जीवन २ योद्धा म्हणून काम करणार आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने वैद्यकीय डॉक्टर्स, कर्मचारी यांना संसर्ग झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. यावर उपाय म्हणून खास हॉस्पिटल्ससाठी रोबोट जीवन २ ची निर्मिती करण्यात आली आहे. सदरचा रोबोट हा सोलापुरातच निर्मित केला गेला असून येथील न्यू एज रोबोटिक्सचे शैलेश ठिगळे व त्यांची मुलं जय व यश ठिगळे यांच्याद्वारे तयार करण्यात आल्याचे रोटरी क्लबने सांगितले.
रोबोटही पाळणार फिजिकल डिस्टन्सिंग- हा एक वायरलेस रोबोट असून मोबाईल फोनद्वारे याचे कार्य चालणार आहे. या रोबोटमध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा असल्याने डॉक्टर्स विशिष्ट अंतरावरून रुग्णांबरोबर बोलू शकणार आहेत. हा रोबोटसुद्धा सोशल डिस्टन्सिंग आपोआप पालन करणार आहे. हा रोबोट सॅनिटायझर, औषधे, गोळ्या आदी रुग्णांजवळ नेऊन देतो तर डॉक्टरांची टीम व्हिडिओ कॉलिंगद्वारे रुग्णांना मार्गदर्शन करू शकणार आहे. हा रोबोट कोरोना फायटर म्हणून कार्यरत राहणार आहे. हा रोबोट डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय व रुग्णांमध्ये एक दुवा असणार आहे.
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी व डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आदी मंडळींचा कोरोनापासून बचाव व्हावा या उद्देशाने रोटरी क्लब आॅफ सोलापूरच्या वतीने दोन रोबोट भेट म्हणून शासकीय रुग्णालयास देण्यात आले आहेत. सोलापुरातील आणखी एका गरजू हॉस्पिटलला अशा प्रकारचा एक रोबोट देण्याचा मानस आहे.- सीए सुनील माहेश्वरी, सचिव, रोटरी क्लब आॅफ सोलापूर