सोलापूर : कोरोनामुळे सोलापुरी टेक्स्टाईल उद्योगाला जवळपास पाचशे कोटींचा फटका बसला आहे. सोलापुरी टेक्स्टाईल उद्योगाची वार्षिक उलाढाल बाराशे कोटींची आहे. डिसेंबर ते जून हा कालावधी हंगामाचा असतो. यंदाचा हंगाम पूर्णपणे संपुष्टात आला आहे. त्यामुळे या उद्योगाची ४० ते ४५ टक्क्यांची उलाढाल घटली आहे. यंत्रमाग उद्योग पूर्वपदावर यायला आणखीन दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे उद्योजक सांगताहेत.
कोरोनामुळे देशविदेशातून मागणी खूप कमी झाली आहे. प्रतिवर्षी सहाशे ते सातशे कोटींची मागणी देशभरातील बाजारपेठांमधून येते. जवळपास चारशे ते पाचशे कोटींच्या टेक्स्टाईल उत्पादनाची निर्यात होते. देशी मार्केटला जवळपास ६०% इतका फटका बसला आहे तर विदेशी मार्केटमधून ५०% इतका फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या मागील चार महिन्यांत टेक्स्टाईल उद्योगाला नवीन आॅर्डर्स नाहीत. पुढील दोन महिन्यांपर्यंत नवीन आॅर्डर्स मिळण्याची शक्यता नाही. २०२१ सालचा सीझन डिसेंबर (२०२०) पासून सुरू होईल, अशी अपेक्षा उद्योजकांना आहे.
एकूण उलाढालीत आठ ते दहा टक्के चादर उत्पादनाचा समावेश आहे. पूर्वी चादर उत्पादनाचा वाटा जवळपास ३० ते ४० टक्के इतका होता. मागील काही वर्षांत चादरींचे उत्पादन खूपच घटले आहे. या लॉकडाऊन काळात चादरींचे अस्तित्व देखील संपुष्टात येत आहे.
सोलापुरी टेक्स्टाईलला विदेशी मार्केटची आवश्यकता...
- - सोलापुरी टेक्स्टाईल उद्योगाला देशी मार्केटसोबत विदेशी मार्केटचीही खूप आवश्यकता आहे. कोरोनामुळे दोन्ही मार्केट ठप्प झाले आहेत. त्यामुळे टेक्स्टाईल उद्योगाला अस्तित्वासाठी लढा द्यावा लागतो.
- - नवीन आॅर्डर्स नसल्याने उद्योजक कारखाने बंद आहेत. त्यामुळे याचा फटका यंत्रमाग कामगारांना बसतोय. कोणी पाच दिवसांचा आठवडा तर कोणी ३ दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. त्यामुळे कामगारांची रोजीरोटी निम्म्यावर आली आहे.
- - किमान आणखीन दोन महिने अशीच स्थिती राहणार आहे. शासनाने कारखानदारीसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी अपेक्षा टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश गोसकी यांनी व्यक्त केली.