सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव हे शासकीय रुग्णालयात दाखल झाले असून, बाधित मुलांची विचारपूस करीत असल्याचे सांगण्यात आले. ४१ मुले ठणठणीत आहेत. त्या मुलांना अचानकपणे ताप येऊ लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व मुलांची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये ती सर्व मुले पॉझिटिव्ह आढळून आली. त्यांना पुढील उपचारांसाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे.
आश्रम शाळेतील ४८ पैकी ४१ मुले पॉझिटिव्ह आढळल्याने शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये सर्वजण निगेटिव्ह आले आहेत.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हॉस्पिटलला भेट देऊन विचारपूस केली. तसेच उपचाराची माहिती घेतली. डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
संस्था चालक, कर्मचाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे
मंगळवेढा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आश्रमशाळेला भेट दिली. आश्रम शाळेमधील मतिमंद मुले मोठ्या संख्येने आल्यामुळे अनेकांनी या ठिकाणी धावती भेट दिली. परंतु, येथील सर्व कारभार गहाळ असल्यामुळे या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी व येथील संस्थाचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. निवडणुकीनंतर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. आता मात्र एकाच शाळेमध्ये मतिमंद मुले मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.