कुर्डूवाडी : कोविशिल्ड लसीच्या अनियमित पुरवठ्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयात काही दिवसांनी लस उपलब्ध होताच सोमवारी पहाटेपासूनच येथील नागरिकांची तोबा गर्दी रुग्णालयाच्या आवारात व आतील बाजूस झाली. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे फिजिकल डिस्टन्सचा उपस्थित पोलिसांदेखतच बोऱ्या वाजला. त्याला येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा, व्यवस्थापन करण्यात कमी पडत असल्याचे समोर आले आहे. या ढिसाळ कारभाराबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लसी उपलब्ध झाल्या दोनशे आणि पाचशे नागरिकांनी त्या घेण्यासाठी गर्दी दर्शविल्याने काही काळ तर गोंधळच उडाला. त्यामुळे कुर्डूवाडीत कोरोना संसर्ग कमी होईना, अन लोकांची गर्दी पण काही केल्या येथील प्रशासनाला हटेना अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले.
कुर्डूवाडी शहराची व परिसरातील गावांची लोकसंख्या पाहता येथे लसीची उपलब्धताही तुटपुंजी आहे. तीही दोन-तीन दिवसांच्या अंतराने उपलब्ध होत आहे. त्यातही २०० व्यक्तींना पुरेल इतकीच लस येथे येते.
लस निर्माण झाली तेव्हा सुरुवातीच्या काळात ६० वर्षांवरील, कोमार्बीड व्यक्ती व फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासाठी ही लस शासनाकडून खुली करण्यात आली होती. त्यावेळी नागरिकांमध्ये त्याविषयी भीती होती. जेव्हा प्रशासनाने ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी कोविशिल्ड लसीकरण खुले केल्यानंतर येथे लसीकरणासाठी गर्दी वाढू लागली. त्याच काळात माढा तालुक्यात व कुर्डूवाडी शहरात कोरोनाचा उद्रेक झाला.
मग लोकांची मानसिकता बदलली. आता या ठिकाणी २ हजार लसींची गरज आहे. तिथे फक्त २०० ते ३०० लसी उपलब्ध होतात. यामुळे येथील लसीकरणासाठी मोठी गर्दी होत असताना दिसत आहे. ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्यांना पहिल्या लसीकरणानंतर ४५ ते ५६ दिवसांच्या आत दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. परंतु अशा लोकांनाही साठ दिवस झाले तरीही दुसरी लस मिळविण्यासाठी चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागते.
मग ऑनलाईन नोंदणीचा फार्स कशासाठी?
अनेक नागरिक हे ऑनलाईन नोंदणी करून येतात. परंतु त्यांनाही पुन्हा इतरांप्रमाणेच ग्रामीण रुग्णालयाच्या रांगेत उभे राहून त्यांचाच नंबर घ्यावा लागतो, मग हा ऑनलाईन नाव नोंदणीचा फार्स कशासाठी असा संतापजनक सवाल माजी सरपंच राजाभाऊ गणगे यांनी उपस्थित केला आहे.
अपुऱ्या उपलब्ध होणाऱ्या कोविशिल्ड लसीमुळे ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यावर उपाय म्हणून आता येथून पुढे आपण नगरपालिकेकडे लसीची नाव नोंदणी करण्यासाठी यंत्रणा उभी करीत आहोत. जेणेकरून ग्रामीण रुग्णालयात नागरिकांना चार- पाच तास रांगेत उभे रहावे लागणार नाही.
- डॉ. सुनंदा गायकवाड, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कुर्डूवाडी
................
२६कुर्डूवाडी-लस
कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात सोमवारी कोविशिल्ड लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांनी केलेली गर्दी.