सोलापूर : शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या दहा हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी ५१७ जणांचा मृत्यू झाला असून, ६६७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरात १२ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल आला होता. या रुग्णाला कोणापासून कोरोनाची लागण झाली याचे स्पष्टीकरण महापालिकेच्या आरोग्य विभागाने आणि पोलिसांनी अद्यापही जाहीर केलेले नाही. मे महिन्यात कोरोनाच्या चाचण्यांना सुरुवात झाली. एप्रिल आणि मे महिन्यात शहरामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. मे अखेरीस ग्रामीण भागातील काही गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. मुंबई आणि पुण्याहून आलेल्या नातेवाईकांमुळे गावात कोरोना आल्याची चर्चा सुरू झाली. जून महिन्यात शहरासोबतच ग्रामीण भागातही रुग्ण वाढू लागले.
जुलै महिन्यात अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय झाल्यानंतर रुग्णसंख्येत आणखी भर पडली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णवाढीचे प्रमाण जास्त आहे. शहरातील कोरोना आटोक्यात येत असल्याचा दावा होत असताना ग्रामीणमध्ये मात्र दररोज २५० हून अधिक रुग्ण आढळत आहेत.
जुलैमध्ये पाच हजारांवर रुग्णसोलापुरात जून अखेरनंतर कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. जुलै महिन्या तर रुग्ण संख्येचा आलेख अधिकच उंचावत गेला. ५ जुलै रोजी ३००० असणारी रुग्णसंख्या १८ जुलैपर्यंत ५००० वर पोहोचले. त्यानंतर संख्या निरंतर वाढत राहीली. २९ जुलै रोजी कोरोना रुग्णांची संख्या ८००० पर्यंत पोहोचली.