कुर्डुवाडी : माढा तालुक्यातील ग्रामीण भागातील रिधोरे, भोसरे, चिंचगाव, दारफळ, लऊळ, मोडनिंब, दगडअकोले, अकुंभे पाठोपाठ आता कुर्डूवाडी शहरातही कोरोनाचा शिरकाव झाला असून दोघेजण कोरोना बाधित रुग्ण म्हणून आढळले आहेत.
बुधवारी सकाळी माढा तालुक्यातील भोसरे येथे १, रिधोरे येथे ४ व कुर्डूवाडी शहरात २ असे एकूण ७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यामुळे तालुक्यात ३४ कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली आहे. कुर्डुवाडीचे दोन रुग्ण व बाकीचे पाच रुग्ण हे पूर्वीच्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पलंगे यांनी सांगितले आहे.
माढा तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २७ वरुन ३४ पोहचली आहे. यात लऊळ, चिंचगाव व मोडनिंब येथील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कुर्डुवाडी शहराला आतापर्यंत काहीही धोका निर्माण झाला नव्हता. कुर्डुवाडी शहरात मोठे रेल्वे जंक्शन आहे, त्याचबरोबर येथेच महत्वाची शासकीय कार्यालये असल्याने शहरात मोठी वर्दळ कायम असते. कोरोनाचा शिरकाव कुडुर्वाडी शहरात झाल्यामुळे तालुक्याच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. कुर्डुवाडीच्या ज्या भागात रुग्ण आढळले आहेत तो भाग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.