कृष्णात अडसूळ यांना मधुकर आणि रवींद्र अशी दोन विवाहित मुले. थोरला मुलगा मधुकर शेती व्यवसायात पारंगत होता, तर दुसरा मुलगा रवींद्रने शेतीबरोबरच कीर्तन सेवेत परिसरात नाव कमावले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अडसूळ कुटुंबातील तीन कर्त्यासवरत्या व्यक्तींवर कोरोनाने घाला घातला. प्रारंभी मधुकर अडसूळ यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना फलटण येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कृष्णात अडसूळ व रवींद्र अडसूळ यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रवींद्रचा २६ एप्रिल रोजी मृत्यू झाला.
वडील आणि मुलगा यांचे बेड रुग्णालयात शेजारीच होते. रवींद्रच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी कृष्णात यांना रवींद्र आपल्या शेजारच्या बेडवर दिसत नसल्याने ते रवींद्रची चौकशी करू लागले. परंतु त्यांना काहीच माहिती मिळू शकत नव्हती. रवींद्र दिसत नसल्याने बेचैन झालेल्या कृष्णात अडसूळ यांना रवींद्रचा मृत्यू झाल्याची कुणकुण लागली. मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्का कृष्णात अडसूळ यांना सहन न झाल्याने त्यांचा २८ मे रोजी मृत्यू झाला.
मधुकर यांनी कोरोनावर मात केली. परंतु त्यांच्या डोळ्याची समस्या निर्माण झाली. त्यामुळे त्यांना डोळ्यावर उपचार करण्यासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा एक डोळा निकामी झाल्याने तो काढला मात्र त्यांच्या शरीराने प्रतिसाद न दिल्याने २४ मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.