सोलापूर : कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मात्र दुसऱ्यांचे जीव वाचविण्यासाठी, दुसऱ्यांच्या मदतीसाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. यामुळे अनेकांना आपला प्राणही गमवावा लागत आहे. अशाच प्रकारे अत्यावश्यक सेवेत काम करत असलेल्या राज्य परिवहन महामंडळातील वाहकाचा कोरोनामुळे शुक्रवारी सकाळी निधन झाले. सुनंदा अशोक कुंभार (वय ४५, रा. नई जिंदगी, मजरेवाडी सोलापूर) असे महिला वाहकाचे नाव आहे.
सुनंदा कुंभार या नोव्हेंबर २०0० पासून एसटी सेवेत रुजू झाल्या. तेव्हापासून त्यांनी उस्मानाबाद, तुळजापूर, बार्शी आणि सोलापूर या ठिकाणी वाहक म्हणून सेवा बजावली. दरम्यान, २१ एप्रिल रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांची तब्येत जास्तच बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी चार दिवसांपूर्वी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले आणि ननंद आहेत. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरव केला होता. दरम्यान, त्यांच्या मृत्यूची माहिती कर्मचाऱ्यांना कळताच कर्मचाऱ्या मधून हळहळ व्यक्त करण्यात येत होते.