सोलापूर : माढा तालुक्यातील आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिकेचा कोरोनाने सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. अशाप्रकारे जिल्हा आरोग्य विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा आत्तापर्यंत बळी गेला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली.
दरम्यान, संबंधित कर्मचारी आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या. चार दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी सायंकाळी सहा वाजता त्या मरण पावल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने सांगितले. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.माढा तालुक्यात आतापर्यंत 1275 रूग्ण आढळले तर 42 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण मध्ये 14 हजार 185 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 411 जणांचा मृत्यू झाला आहे.
ग्रामीणमध्ये संसर्ग वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. जिल्हा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा हा तिसरा बळी आहे. यापूर्वी कुरघोट येथील आशा वर्कर, गादेगाव येथील एका शिपायाचा मृत्यू झाला आहे.
'त्या' अधिकाऱ्याची मात
दहा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली होती मुंबईला मंत्रालयाला कामानिमित्त गेल्यावर हा संसर्ग झाला असल्याचा दावा त्यांनी केला, पण वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केल्याचे त्यांनी सांगितले.