सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाच्या संपर्कात होते तरीही ते मतदार संघात फिरत राहिले. पण माळशिरसच्या भाजप आमदाराविरूद्ध कोणीतरी तक्रार केली म्हणून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला कोरोना माफ आहे काय? असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना केला.
सोलापुरातील कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजीतसिंह मोहिते—पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याशी संवाद साधताना मी काही तुमचा पंचनामा करायला आलेलो नाही. सोलापुरात पॉझीटीव्ह रुग्ण व मृत्यूची संख्या वाढतेय. ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी व कोठे चुका होताहेत हे दाखवून देण्यासाठी आलो आहे. असे सांगितले. प्रशासनाने कोरोना विषाणूबाबत केंद्र व राज्य शासनाच्या ज्या नियमावली आहेत, त्याप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. मोहोळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला का क्वारंटाईन करण्यात आलेले नाही याचे उत्तर आम्हाला हवे आहे. भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते—पाटील हे स्वत: होम क्वारंटाईन झाले. पण केवळ राजकारण म्हणून कोणी तक्रार केली तर खातरजमा करून कोराना साथीच्या प्रतिबंधाच्या उपाययोजना करायला हव्यात असे फडणवीस ठणकावून सांगितले. फडणवीस यांनी जिल्हाधिकाºयांनी कोण कोणते आदेश काढले व त्याची अंमलबजावणी कशी झाली याची माहिती घेतली.
कोरोना रुग्णांच्या उपचाराबाबतीत समन्वय अधिकारी कोण, रुग्ण रेफर करताना काळजी घेतली जाते काय याबाबत माहिती विचारून उपाययोजनेच्या सूचना केल्या. निधीचाची माहिती विचारल्यावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी महापालिकेला दोन, झेडपीला अडीच आणि सिव्हिल हॉस्पीटलला आठ कोटी दिल्याचे सांगितले. नगरपालिकांना किती निधी दिला असे विचारताच शासनाकडे मागणी केल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. त्यावर फडणवीस यांनी पंढरपूर व अक्कलकोट नगरपरिषदेला निधी द्या, अकलुज व पंढरपुरात कोरोणा चाचणीची सोय करा अशी मागणी केली. प्रशासनाच्या चुका न काढता प्रशासन काय चुकतयं हे मी सांगतोय. सोलापूरचा मृत्यूदर व साथ कमी झाली तरच मला आनंद वाटेल असे म्हणत फडणवीस यांनी कोरोनाचे रुग्ण व मृत्यूदर कमी करण्यासाठी सतत रुग्ण आढळणाºया भागावर लक्ष केंद्रीत करा अशा सूचना दिल्या.
साहित्य आणि मृत्यूबद्दल तक्रारी
आमदार राजेंद्र राऊत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात साहित्याचा तुटवडा असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी नातेवाईकांना रुग्णाच्या मृत्यूबद्दल चार चार दिवस माहिती दिली जात नाही अशी तक्रार केली. शासनाच्या नव्या आदेशानुसार यापुढे कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या भेटीबद्दल माहिती बाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने वृत्तपत्र प्रतिनिधींना कार्यालयात प्रवेश नाकारला.
महापौरांचे बिल तपासा
खाजगी रुग्णालयात शासनाच्या नियमाप्रमाणे बिल आकारले जातेय काय असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांना विचारला. तसे असेल तर महापौरांचे दोन लाख बिल आले आहे. त्या हॉस्पीटलने असे कोणते त्यांच्यावर उपचार केले, याची तपशीलवार बिलावरून माहिती घ्यावी. महापौरांचे बिल इतके असेल तर इतरांचे काय असा सवाल त्यांनी केल्यावर सर्वजण निरूत्तर झाले.