सोलापूर - सोलापूर शहरातील कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात सोलापूर शहरात बाळे, जोडभावी, मजरेवाडी भागात नव्याने चार रूग्ण आढळले असून सोलापूर शहर व जिल्ह्यातील रूग्णसंख्या आता ४४ वर पोहोचली आहे. मंगळवारी १३ रूग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
दरम्यान, बुधवारी नव्याने आढळलेले रूग्ण हे ३१ ते ५० व ६० वर्षापुढील रूग्ण आहेत. मंगळवारी १२५ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी १२१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून तीन पुरूष व एक स्त्रीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारच्या अहवालात एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद आहे. आतापर्यंत सोलापुरात ३४ हजार ६४५ कोरोना रूग्ण आढळून आले असून आतापर्यंत १ हजार ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. ३३ हजार ९५ लोक बरे होऊन रूग्णालयातून घरी गेले आहेत. शहरात कोरोनाचा पहिला डोस घेतलेले ८५ टक्के तर दुसरा डोस घेतलेले ६४ टक्के लोक असल्याचेही नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालात करण्यात आली आहे. दरम्यान, लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे, मास्कचा वापर करावा, लक्षणं आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे, औषधोपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
ग्रामीणमधील रूग्णसंख्या पोहोचली १३ वर
सोलापूर जिल्ह्यात म्हणजेच ग्रामीण भागात सध्या १३ कोरोनाचे रूग्ण आहेत. अक्कलकोट ३, बार्शी ३, करमाळा १, माढा २, उत्तर सोलापूर १, पंढरपूर १, दक्षिण सोलापूर २ असे एकूण १३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारच्या अहवालात नव्याने एक रूग्ण आढळून आला आहे. अद्याप ११ व्यक्तींवर घरातच उपचार सुरू असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.