दुसऱ्या लाटेतून तालुक्यातील ११७ पैकी ३९ गावे ही पूर्णतः कोरोनामुक्त झाली असून अद्यापपर्यंत ७८ गावांत मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येणार असल्याची शक्यता सगळीकडे वर्तवली जात असताना येथील झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब बनली आहे. माढा तालुक्यात २ लाख ३१ हजार नागरिक हे कोविड लसीकरणाचे लाभार्थी असून, त्यापैकी आतापर्यंत कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे दोन्ही लस पूर्ण झालेले केवळ ७.४५ टक्के इतकेच लाभार्थी आहेत. तर, पहिला डोस पूर्ण झालेले २०.२७ टक्के लाभार्थी असल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. लसीकरण वेगाने करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याकडे मात्र येथील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
कुर्डूवाडी शहरातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे शहरात होणारी बिनकामी गर्दी थांबवणे येथील नगरपरिषद प्रशासनापुढे आव्हान उभे टाकले आहे. येथील आरोग्य विभागाकडून वारंवार शहरवासीयांना आवाहन केलं जातं असून, लसीकरणाला अधिक प्राधान्य दिले गेले आहे. मात्र, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता सतर्क होणे आवश्यक आहे.
----
कोरोनाची संख्या अधिक असणारी गावे
कुर्डूवाडी, माढा, रांझणी, वडोली, चांदज, आढेगाव, टेंभुर्णी, पिंपळखुंटे, निमगाव (टें), पिंपळनेर, बावी, अरण, मोडनिंब, रणदिवेवाडी, शिंदेवाडी, उपळाई (बु), केवड, कापसेवाडी, तांदूळवाडी.
----