सोलापूर : मारहाणीत गंभीर जखमी झालेली अनिता जाधव शासकीय रुग्णालयात मरण पावली. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होईपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका पती संजयने घेतली. डॉक्टरांंनी आधी मृत अनिताला कोरोना झाल्याचे सांगितले, नंतर शवविच्छेदन झाले. त्यात तिचा अहवाल निगेटिव्ह आला. केवळ आरोपींना वाचवण्यासाठीच शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला. दरम्यान, कारवाईचे आश्वासन पोलिसांनी देताच पती संजयने अनिताचा मृतदेह ताब्यात घेतला.
अनिता जाधव व त्यांचे पती संजय जाधव यांनी २००५ साली तिरुपती नगर येथील क्रीडांगणाची जागा घेतली होती. जागेत त्यांनी शांताई अनाथाश्रम बांधले होते. मात्र, ती जागा आमची आहे, अशी हरकत काही लोकांनी घेतली होती. त्यावर त्यांनी न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. ‘न्यायालयामध्ये दाखल केलेला खटला माघारी घे आणि आमची जागा सोडून जा’, अशी धमकी अनिता जाधव व त्यांच्या पतीला दिली जात होती. ११ जानेवारी रोजी चार ते पाच जण रात्रीच्या सुमारास आश्रमाच्या शेजारी असलेल्या अनिता जाधव यांच्या घरामध्ये आले. ‘न्यायालयातील खटला मागे घ्या आणि आमची जागा सोडा’, असे म्हणत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत अनिता जाधव या जखमी झाल्या, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
न्यायालयात खटल्याची तारीख असल्याने त्यांचा डिस्चार्ज घेण्यात आला होता. मात्र, पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. यापूर्वी मारहाण केल्याप्रकरणी चार ते पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली होती. गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
पोलीस अन् नातेवाईकांसमोर शवविच्छेदन
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात यावे, अशी मागणी नातेवाईकांनी केल्यानंतर डॉक्टरांनी प्रथमत: मयत अनिता जाधव यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. आम्हाला आश्चर्य वाटले; मात्र आम्ही शवविच्छेदन करण्यास सांगितले. पोलीस व दोन नातेवाईकांच्या समोर शवविच्छेदन झाले. कोरोनाची टेस्ट पूर्ण झाली; मात्र तो अहवाल निगेटिव्ह आला. हा सर्व खोडसाळपणा सुरू होता. प्रकरण दाबायचे होते, शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती छावा संघटनेच्या शहराध्यक्ष रूपाली जाधव यांनी ‘लोकमत’शी दिली.