सोलापूर : जिल्ह्यातील १0२९ गावांपैकी आता ७३६ गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. १३ आॅगस्ट रोजी ६०९ गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले होते. पण आता महिनाभरात ३१६ गावांची वेस कोरोना विषाणूने ओलांडल्याचे चित्र दिसत आहे.
एप्रिलअखेरपर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या जिल्ह्यात आता संसर्ग वाढला आहे. अजूनही २९३ गावांनी कोरोनाला वेशीवर अडवून ठेवण्यात यश मिळविले आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर लोक कोरोनाबाधित गावे व शहरांमध्ये प्रवास करू लागल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे आरोग्य अधिकाºयांचे म्हणणे आहे. लॉकडाऊन काळात नियम कडक असल्याने प्रत्येक गावांमध्ये बाहेरून येणाºयांना प्रवेश दिला जात नव्हता. त्याचबरोबर जे कोणी गावकरी बाहेरून परतले त्यांना शाळेत चौदा दिवस अलगीकरणात ठेवण्यात येत होते. पण आता हे नियम शिथिल झाल्याने गावकरी कामानिमित्त कुठेही फिरत आहेत. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे.
अनलॉकनंतर ग्रामीण भागात रुग्ण वाढत गेले. १३ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६0९ गावे कोरोनामुक्त होती व फक्त ६ हजार ७७२ पॉझिटिव्ह रुग्ण होते व मृतांची संख्या फक्त १९४ होती. पण आता महिना होत नाही तोवर ९ सप्टेंबरअखेर रुग्णांची संख्या १४ हजार ९१६ तर मृतांची संख्या ४३९ झाली आहे.
का वाढतोय संसर्ग ?लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर कामानिमित्त लोक बाहेर पडले. बाधित गावे व शहरात प्रवास. कोरोना प्रतिबंधासाठी सांगितलेल्या मास्क वापर, फिजिकल डिस्टन्स, हात धुणे या नियमावलीचा विसर. भाजीपाला, इतर खरेदीसाठी गर्दीत वावर.
तपासणीकडे होतेय दुर्लक्ष..जिल्ह्यात सतत ढगाळी हवामान. यामुळे सर्दी, खोकला, तापाचा त्रास. त्रास होऊनही आजार अंगावर काढणे. ज्येष्ठ व्यक्तींच्या आजाराबाबत माहिती न देणे. गरज नसताना प्रवास करणे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावरही माहिती न देणे.
आम्ही हे करतोय...ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रॅपिड अँटिजेन चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. याद्वारे बाधितांचा शोध घेऊन संसर्गावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होत आहे. तरीही चाचणी करण्यास लोकांची मानसिकता दिसत नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी सांगितले.