मैंदर्गी येथे दौलप्पा सवळी हे गरीब कुटुंब. अजित व राजशेखर ही त्यांची मुलं. उच्चशिक्षित झाल्यानंतर १५ वर्षापूर्वी मंत्रालयातील उपसचिव विद्यासागर हिरमुखे या मामाच्या आशीर्वादानं त्यांनी पुणे गाठले. तेथे बांधकाम व्यवसायात जम बसवला. कामाच्या व्यापानं गावी फारसं येणं नसायचं. आठ वर्षांपूर्वी राजशेखर यांनी मैंदर्गीत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. या निमित्ताने ये-जा वाढली. एप्रिल महिन्यात लॉकडाऊन पडल्यानंतर सहकुटुंब गावाकडे आले होते.
दरम्यान, लातूर येथील एका मामाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. अंत्यसंस्कारासाठी घरातील अनेक जण गेले होते. त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी अजित याना त्रास होऊ लागला. तपासणी केली. रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. सोलापूर येथे हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू केले होते. त्यानंतर उर्वरित लोकांची तपासणी केली असता, मोठा भाऊ राजशेखर याना कोरोनाचे लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना लातूर येथेच उपचार सुरू होते. दरम्यान, घरातील अन्य लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.
१८ मे रोजी राजशेखर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांच्यावर मैंदर्गी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर केवळ चार दिवसांच्या फरकाने २२ मे रोजी त्यांचा लहान भाऊ अजित यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात, आई, वडील, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या दोन्ही घटनांमुळे मैंदर्गी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
----
बोध घेऊन काळजी घ्या!
गरिबीचे चटके सोसून मुलांन वैभव उभं केलं. आता याच वैभवानं सर्व जण गुण्यागोविंदानं नांदत असताना काळानं घातला म्हणत अजित, राजशेखर यांच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला. अफाट पैसा खर्च करूनही सोन्यासारखी मुलं वाचू शकली नाहीत. गावातील पोरांसाठी इंग्रजी शाळा सुरू केली. आपल्या हाती काही नाही. लोकांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा बोध घेऊन काळजी घ्यावी, अशी चर्चा मैंदर्गी परिसरात सुरू आहे.
----