सोलापूर : महापौर निवासानंतर आता महापालिका आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि बांधकाम परवाना विभागातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या अधिकाऱ्यांच्या संपर्कातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे स्वॅब घेण्यात येत आहेत.
मनपा सहायक नगररचना कार्यालयातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेतल्यानंतर कोरोनाचे विषाणू आयुक्त कार्यालयात पोहोचल्याचे स्पष्ट झाले. आयुक्तांशी नियमित संपर्क ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला कोरेानाची लागण झाली आहे. हे अधिकारी आसरा चौक परिसरात राहतात. हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
महापालिकेत यापूर्वी एक नगरसेविका आणि तिचा पती, २० हून अधिकारी कर्मचारी, बुधवार पेठ परिरसरातील एका नगरसेवकाचा भाऊ यांना कोरोना झाला आहे. आयुक्त कार्यालयात कोरोना घुसल्यामुळे इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.