सध्या अनेक लोक हे शहरातून काही ना काही निमित्त करून बिनधास्तपणे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत उघड माथ्याने फिरत आहेत. यामुळे ज्यांच्या घरातील नातलग या कोरोनाच्या महामारीत गेले. त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. ‘आम्ही कोरोनात कधीही न भरून येणारे फटके सोसलेत, जवळच्या माणसाचा आधार गेल्याने होणारे दु:ख आम्ही सोसतोय, तुमच्यावर ती वेळ येऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शहरात गेल्या वर्षभरापासून २१ एप्रिल २०२१ अखेरपर्यंत ९४८ जणांना कोरोनाने घेरले होते. त्यातून ७२३ जण ठणठणीत बरे झाले आहेत. सध्या १८९ जण यावरील उपचार घेत आहेत. मात्र, या कालावधीत तब्बल ३७ जणांना मृत्युमुखी पडावे लागले. मृत्युमुखी पडलेल्या ३७ जणांपैकी ५ जण तरुण तर इतर सर्व पन्नाशीच्या वरील आहेत. काहींच्या घरात तर एक सदस्य गेला म्हणून त्याच्या दु:खावेगाने इतर काही सदस्यही आपला जीव गमावून बसलेले आहेत. ही वेळ इतरांवर येऊ नये, असा सूर या नातलगांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
...................
आमचे चुलते कृषी अधिकारी होते. त्यांच्या आईला म्हणजे आमच्या आजीला कोरोना झाला. त्यातच आठवड्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. याचा मानसिक धक्का त्यांना बसला. त्यातून ते बाहेरच आले नाहीत. दरम्यान त्यांनाही कोरोनाने घेरले. पुण्यातील दवाखान्यात उपचार घेताना त्यांचीही प्राणज्योत बुधवारी मावळली. एका आठवड्यात आमच्या कुटुंबातील महत्त्वाच्या दोघांचा मृत्यू झाल्याने जबरदस्त धक्का बसला आहे. लोकांनी शहाणे होऊन काळजी घ्यावी.
- सचिन गावडे, नातेवाईक
.................
ज्या आईने मला लोकांची धुणी-भांडी घासून मोठे केले. नगरपालिकेत नोकरीस लावले आणि नेमके तिलाच कोरोनाने गाठले. नियतीने तिला त्यातून सोडलेच नाही. त्यातच तिचा मृत्यू झाला. याचे खूप दुःख मला झालेले आहे. आम्ही या कोरोनात खूप सोसलेय, लोकांनी शासनाने दिलेल्या सूचना अमलात आणून स्वतःची काळजी घ्यावी.
- सुनील कोळी, कुर्डूवाडी
....................