पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रांझणी (ता. पंढरपूर) येथे आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, भगीरथ भालके यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपुरातील अनेक नेत्यांचे कोरोनामुळे निधन झाले. असे असताना राजकीय मंडळींनी कोरोनाबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या सभेला गर्दी करण्यात आली होती; परंतु कोरोना नियमांचे कोणतेही पालन करण्यात येत नव्हते. या ठिकाणी सॅनिटायझरची सोय नव्हती. अनेक कार्यकर्त्यांनी मास्कचा वापर केला नव्हता. असे असताना मंत्र्यांनी तरी कोरोनाबाबत जनजागृती करणे गरजेचे होते. मात्र स्वतःच जयंत पाटील यांनीच ‘तुमचे चेहरे पहिल्यानंतर कोरोना जगात नाही, असे वाटते. यामुळे मास्क काढून बोलतोय,’ असे वक्तव्य केले.