सोलापूर : शहरातील किराणा, भाजी-फळे, मांस विक्रीची दुकाने उद्या दि. १५ मेपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवता येतील, असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत. उर्वरित सर्व दुकाने १ जूनपर्यंत बंद असतील. शहरात प्रवेश करायचा असेल तर कोरोना चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक असेल.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी शहरातील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी शहरातील दुकाने व घरपोच सेवा सुरू असेल, असे आदेश दिले होते. त्यानुसार पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आदेश जारी केले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जाहीर केलेला लॉकडाऊन १ जून सकाळी सात वाजेपर्यंत कायम असेल. परंतु, अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकाने, फळ व भाजी, मांस, अंडी विक्री करणाऱ्या दुकानांना सकाळी ७ ते ११ या कालावधीत परवानगी आहे. दुधाचे संकलन, वाहतूक व प्रक्रिया तसेच घरपोच सेवा देण्यास परवानगी आहे. मात्र, त्यांनी यापूर्वी दिलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवेतील उत्पादक व निर्यातदारांना नियम व अटी लावून परवानगी असेल.
माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत एकाचवेळी वाहनांमध्ये दोन व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करता येणार नाही. ही वाहने राज्याबाहेरील असतील तर त्यांनी राज्यात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तास अगोदर केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र सात दिवसांसाठी वैध असेल.
आरटीपीसीआर चाचणी अहवाल आवश्यक
महापालिका हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना मागील ४८ तासांपूर्वी केलेला आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक असेल. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना हा नियम अनिवार्य असेल, असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. याचा फटका ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांना बसणार आहे.