पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत आहेत; परंतु पुढे काही दिवसांतच आषाढी यात्रा सोहळा आहे. हा आषाढी यात्रा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सध्या लॉकडाऊनही शिथिल झाले आहे. यामुळे शहरातील शासकीय कार्यालये, बाजारपेठा व बँका याठिकाणी नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे. या गर्दीतून कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी पंढरपूर नगर परिषद प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणीच कोरोनाची टेस्ट करण्याची मोहीम सुरू केली आहे. कोरोना टेस्ट होत असलेल्या ठिकाणी मुख्याधिकारी अरविंद माळी भेट देत आहेत.
मंगळवारी ५५० नागरिकांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये ५ नागरिक पॉझिटिव्ह तर बुधवारी ६०० च्या आसपास टेस्ट केल्या. त्यामध्ये एकजण पॉझिटिव्ह आढळला असल्याची माहिती उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, वरिष्ठ लिपिक रामचंद्र वाईकर, लिपिक चेतन बुध्याळ यांनी दिली.
या पथकांची नेमणूक
स्वप्निल डोके यांनी अंबाबाई पटांगण परिसरातील मठ, अतुल केंद्रे व प्रज्ञा देशमुख संत नामदेव पायरीजवळ, अनिल अभंगराव सांगोला चौक व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौक, धनाजी साळुंखे स्टेट बँकेजवळ, सुवर्णा डमरे हे पंढरपूर तहसील कार्यालय येथे जमणाऱ्या नागरिकांची कोरोनाची टेस्ट करणार असल्याचे वरिष्ठ लिपिक रामचंद्र वाईकर यांनी सांगितले.
महाराजांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यामुळे सर्वांची कोरोना टेस्ट बंधनकारक नसावी; परंतु शहरातील स्थानिक मठ चालकांची कोरोनाची टेस्ट करण्याची मोहीम सुरू केली आहेत. मठ चालकांच्या इच्छेनुसार कोरोनाची टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी पंढरपुरातील महाराज मंडळींनी मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे केली. यावेळी श्री समस्त वारकरी फडकरी, दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह.भ.प. भारत महाराज पैठणकर, ह.भ.प. विठ्ठल महाराज पैठणकर, ह.भ.प. श्रीकांत महाराज ठाकूर, ह.भ.प. विवेक महाराज गोसावी उपस्थित होते.
फोटो लाईन : पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याशी चर्चा करताना पंढरपुरातील महाराज मंडळीचे शिष्टमंडळ.
फोटो लाईन : पंढरपूर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परिसरात गर्दी केलेल्या नागरिकांची कोरोना टेस्ट करताना नगर परिषदेचे कर्मचारी.