सोलापूर : कोरोनाच्या तिन्ही लाटेत बहुतांश सोलापूरकरांना कोरोना टेस्टचा सामना करावा लागला आहे. कोरोना रोखण्यासाठी टेस्टशिवाय पर्याय नसल्याने जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत तब्बल ३३ लाख ६६ हजार ९९४ कोरोना टेस्ट केल्या आहेत. यापैकी दोन लाख १२ हजार सोलापूरकर हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले. एकूण टेस्टपैकी सत्तर टक्के टेस्ट या ॲन्टीजन असून, ३० टक्के आरटीपीसीआर टेस्ट आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टेस्टची संख्या वाढवली असून, रोज चार ते पाच हजार टेस्ट केल्या जात आहेत.
टेस्टसाठी प्रशासनाकडून कोट्यवधीचा निधी खर्च झाला असून, अद्याप प्रशासनाकडे साडे तीन लाख टेस्ट किट शिल्लक आहेत. जिल्ह्यात अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांची संख्या ३५ लाख ७० इतकी हजार आहे. तसेच, २०११ च्या जनगणनेनुसार जिल्हा प्रशासनाकडे अठरा वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या ३४ लाख १४ हजार इतकी आहे. एकूण लोकसंख्येच्या जवळपास ७० ते ७५ टक्के नागरिकांची कोरोना टेस्ट झाली आहे. सर्वाधिक टेस्ट या १८ ते ६० वयोगटापुढील नागरिकांच्या झाल्या आहेत. म्हणजे मतदार यादीतील एकूण मतदारांपैकी ६५ ते ७० टक्के मतदारांची कोरोना टेस्ट झाली आहे.
एका टेस्टसाठी सातशे ते आठशे रुपये खर्च
ॲन्टीजन टेस्टचा खर्च साधारण १२० ते १५० रुपये आहे. यासोबत आरटीपीसीआर टेस्टसाठी ७०० ते ८०० रुपये खर्च येतो. आरटीपीसीआर टेस्टचा रिझल्ट येण्यासाठी कमीत कमी बारा तास आणि जास्तीत जास्त ४८ तास लागतात. काही टेस्ट किट या राज्यशासनाकडून उपलब्ध झाल्या, तर काही जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निधीतून खरेदी केल्या आहेत. सध्या जिल्ह्यात ३ लाख ५० हजार ॲन्टीजन किट, तसेच ३ हजार आरटीपीसीआर किट शिल्लक आहेत.
- एकूण टेस्ट : ३३ लाख ६६ हजार ९९४
- ग्रामीण भागातील टेस्ट : २८ लाख ११ हजार ५४०
- शहरातील टेस्ट : ५ लाख ५५ हजार ३५४
- पॉझिटिव्ह संख्या : २ लाख १२ हजार ६८२
- एकूण मृत्यू : ५१७१
- सध्या सक्रिय रुग्ण : ५३१६
.....................