पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी सर्व संतां पादुका पंढरपूरला येतात. मात्र कार्तिकी यात्रेतील असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या पादुका पंढरपुरातून आळंदीकडे जातात. यंदा कोरोनाचे संकट असल्याने पांडुरंगाच्या पादुकाही एस.टी. बसने ११ डिसेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास आळंदीला जाणार आहेत. यामुळे ९ डिसेंबर रोजी पादुका घेऊन जाणाऱ्या २० जणांची कोरोना चाचणी होणार आहे.
कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूरची यात्रा भरते. कार्तिक वद्य एकादशीला आळंदी येथे यात्रा भरते. यामध्ये एकादशीनंतर त्रयोदशीला संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा दिवस असतो. अनेक वर्षांपासून संत नामदेव यांच्या पादुकांसमवेत विठ्ठलाच्या आणि संत पुंडलिक यांच्याही पादुका आळंदीला जातात.
प्रतिवर्षी कार्तिक पौर्णिमेदिवशी पंढरपूर येथून संत नामदेव महाराज आणि विठोबाच्या पादुका रथोत्सवातून आळंदी येथे पायी प्रस्थान ठेवतात. एकादशी व संजीवन समाधी सोहळा करून परत अमावस्येला पंढरीत येतात. यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे पायी सोहळा जाणे शक्य नाही.
पांडुरंग, संत नामदेव महाराज व संत पुंडलिक महाराजांच्या पादुका एसटीने आळंदीकडे पाठवण्यात याव्यात. असा प्रस्ताव श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने शासनाकडे पाठविला होता. त्याप्रमाणे २० व्यक्तींना एस.टी. बसने आळंदीला जाण्याची परवानगी दिली आहे.
या वीस जणांचा सहभाग
श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे १५ लोक या पांडुरंगाच्या पादुका घेऊन सोहळ्यासाठी जाणार आहेत. यामध्ये ३ नित्योपचार करणारे कर्मचारी, ७ भजन-कीर्तन करणारे कर्मचारी, १ सुरक्षारक्षक, २ नैवेद्य तयार करणारे कर्मचारी, मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह.भ.प. जवंजाळ महाराज व ह.भ.प. विठ्ठल वासकर महाराज यांच्या दिंडीतील ५ लोक असे एकूण २० जण जाणार आहेत.
सोहळ्यासाठी एसटी मोफत
श्री पांडुरंगाच्या पादुका एसटीने आळंदीकडे घेऊन जाण्यात येणार आहेत. त्यासाठी श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून कोणतेही मूल्य घेण्यात येणार नाही. एसटीची सजावट करून ती १० डिसेंबरला मंदिर समितीच्या ताब्यात देणार असल्याचे आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी सांगितले.
---पांडुरंगाच्या पादुका ११ डिसेंबरला सकाळी १० वाजता आळंदीकडे प्रस्थान ठेवणार आहेत. त्रयोदशीला पांडुरंगाच्या पादुका मंदिरात नेण्यात येतात. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत.
- विठ्ठल जोशी, कार्यकारी अधिकारी, श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर