मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
येत्या २३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याचा महत्वाचा भाग म्हणून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा शहरातील ग्रामिण रुग्णालयासह सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, तालुक्यातील ५५ शाळा मधील ६४७ शिक्षकांपैकी शुक्रवार सायंकाळ पर्यत ३२५ शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली यामधे दोन शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत.
काही शिक्षक आपल्या गावाकडे दिवाळी सुट्टी निमित्त रवाना देखील झाले आहेत त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संपर्क होऊन शिक्षक बाधित झाले आणि लगेच शाळा सुरू झाल्या तर संसर्गाची भीती पालकांना सतावत होती, यासाठी दिवाळी सुटीनंतर शिक्षकांची कोरोना चाचणी करायला हवी होती अशी चर्चा होती त्याबाबत शासनाने आदेश काढून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक केली होती त्यामध्ये ज्याना दमा, ह्रदयविकार, शुगर, थायरॉईड यासारखे आजार असणाऱ्याची आर्टिपीसीआर करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे तर इतर शिक्षकांची रॅपिड अँटिजेंन चाचणी करण्याचे आदेश आहेत, शासन निर्णयानुसार सध्या १७ ते २२ नोव्हेंबर या काळात शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू असून आजपर्यंत ३२५ शिक्षकांची कोविड तपासणी करण्यात आली यामध्ये दोन शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत.
टप्प्याटप्प्याने होणार चाचण्यामंगळवेढा तालुक्यात नववी ते दहावी, बारावी पर्यंत ५५ शाळा आहेत अकरावी आणि बारावी सात कनिष्ठ महाविद्यालय आहे. त्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक यांची तपासणी शुक्रवारी शनिवारी पहिल्या टप्प्यात दोन दिवस करण्यात येणार आहे, त्यानंतर इयत्ता सहावी ते आठवी ला शिकणाऱ्या सर्व शिक्षकाची कोरोना चाचणी दुसऱ्या टप्प्यात तर तिसऱ्या टप्प्यात पहिली ते पाचवी पर्यंत असलेल्या प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षकांना चाचणी घेण्यात येणार आहे. इयत्ता नववी ते बारावीपर्यंत असलेल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा परिसर वर्गखोल्या स्वच्छता करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे, येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी शाळा-महाविद्यालये गेटवर होणार आहे. तत्पूर्वी शाळा महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती पत्र शिक्षकांना भरून घ्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ हवा खुल्या जागेत बसण्याची व्यवस्था शाळा महाविद्यालयाना करावी लागणार आहे. प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांना मास्क बंधनकारक केले असल्याने त्याशिवाय शाळा परिसरात प्रवेश दिला जाणार नाही असे आदेश गटशिक्षणाधिकारी पी. के. लवटे यांनी सर्व सर्व शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्यांना पाठवले आहे . फिजिकल डिस्टंसिंग ही सर्वात महत्वाची बाब सर्वांना पाळावी लागणार आहे.
शहरातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात किती शिक्षकांनी कोविड तपासणी केली याचा रोजच्या रोज अहवाल गटशिक्षणाधिकारी पी के लवटे घेत आहेत शुक्रवार सायंकाळ पर्यत तालुक्यातील ३२५ शिक्षकांची तपासणी करण्यात आली यामध्ये दोन शिक्षक पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉ प्रमोद शिंदे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.
प्रत्येक शिक्षकाला चाचणी बंधनकारक
शाळेत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन दिवस आधी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे .ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे तालुक्यातील ५५ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तील ६४७ शिक्षकांपैकी ३२५ शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली यामध्ये दोन शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत.- पी. के. लवटे, गटशिक्षणाधिकारी, मंगळवेढा