वाढता प्रादुर्भाव पाहून पोलिसांनी शहरात बऱ्याच ठिकाणी नाकाबंदी केली आहे. किरकोळ कारण सांगून बाहेर फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तरीही विनाकारण फिरणाऱ्या लोकांची संख्या कमी होत नाही. यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने आरोग्य प्रशासनाच्या साहाय्याने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरच कोरोना अँटिजेन टेस्ट सुरू केली आहे. कोरोना टेस्ट होत असल्याचे पाहून अनेकजण मिळेल त्या वाटने पळ काढण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी नाकाबंदी करून अनेक जणांची टेस्ट केली.
अशा पद्धतीची नाकाबंदी कधीही, कोणत्याही ठिकाणी करून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करणार आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या लोकांची रवानगी केअर सेंटरला करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
चौघांची कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तहसीलदार सुशील बेल्हेकर, पोलीस निरीक्षक अरुण पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले हे आरोग्य व पोलीस विभागाच्या पथकासह अचानक अर्बन बँकेजवळील चौकात पोहोचले. तेथे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या ४० नागरिकांची कोरोना टेस्ट जागेवरच करण्यात आली. या तपासणीदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या चार लोकांची रवानगी थेट कोविड केअर सेंटरला करण्यात आली.
फोटो ::::::::::::::::::::::
पंढरपुरातील अर्बन बँकेजवळील चौकातील रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची डॉक्टरांमार्फत कोरोना चाचणी करताना उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, प्रांताधिकारी सचिन ढोले, डॉ. एकनाथ बोधले व अन्य.