कोरोनाच्या पहिल्या लाटेत अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत होते. यामुळे श्री स्वामी समर्थ मंदिराच्या रुग्णालय जागेत ‘डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर’ सुरू करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पुढाकार घेऊन तहसीलदार अंजली मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आश्विन करजखेडे, डॉ. अशोक राठोड यांनी बैठक घेऊन एकमत झाल्याने कामाला सुरुवात झाली होती. आर्थिक अडचणीमुळे काम थांबत असताना आमदार कल्याणशेट्टी यांनी स्वतः ४ लाख रुपयांची मदत केली. उर्वरित मदत जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिली. तेव्हा सर्व यंत्रणा कार्यान्वित झाली. मात्र, मनुष्यबळाअभावी सेंटर प्रलंबित होते. आता पुन्हा नव्याने दुसरा लाटेत झपाट्याने रुग्ण वाढू लागले आहेत. सोलापुरात तालुक्यातील अनेक रुग्णांना बेड मिळेना झाले आहे. यामुळे जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदारांच्या सहकार्याने अखेर कामाला गती आली आहे.
येत्या दोन दिवसांत हॉस्पिटल कार्यरत होणार आहे. यामुळे अक्कलकोट तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन, रेमिडेसिविर इंजेक्शनची सोय होणार आहे.
---
येत्या दोन दिवसांत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू होणार आहे. ऑक्सिजन आणण्यासाठी सोलापूर येथे वाहन पाठवून दिले आहे. या रुग्णालयामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची सोय होणार आहे. यामुळे सोलापूर येथील भार कमी होणार आहे.
-डॉ. अशोक राठोड, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, करमाळा
----
२५ बेडची असेल सुविधा
अक्कलकोट येथे कार्यरत होणाऱ्या हॉस्पिटलमध्ये सहा वैद्यकीय अधिकारी, ११ कर्मचारी असणार आहेत. यासंबंधीचे आदेश तहसीलदारांनी काढले आहेत. दोन दिवसांत हॉस्पिटल कार्यरत होणार आहे. यामुळे अक्कलकोटकरांना दिलासा मिळाला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आदी सुविधा असणार आहेत. येथे २५ बेडची सोय असणार आहे.