सोलापूर : शासनाने जाहीर केलेल्या ज्येष्ठ व कोमोर्बीड रुग्णांना सरकारी दवाखान्यातून मोफत लस मिळणार आहे. त्याचबरोबर इतर नागरिकांना ही लस घ्यायची असल्यास खासगी रुग्णालयात सोय करण्यात आली असून, २५० रुपयाला एक डोस घेता येणार आहे. मोफत लसीची २२ सरकारी, तर शुल्क आकारून लस देण्याची ३६ खासगी रुग्णालयात सोय करण्यात आली आहे.
आरोग्य विभागातर्फे या आधीपासून खासगी व सरकारी आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना मोफत लसीकरण सुरू आहे. यानंतर शासनाने १ मार्चपासून ६० वर्षांपुढील ज्येष्ठ व्यक्ती व ४५ वर्षांवरील कोमोर्बीड (गंभीर आजार असलेले) व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. या व्यक्तींनाही खासगी रुग्णालयातून लस हवी असल्यास शुल्क आकारण्यात येणार आहे. इतर व्यक्तींसाठी खासगी रुग्णालयात लस देण्याची सोय करण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना असलेल्या रुग्णालयांना ही लस देण्यास मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यात ३६ खासगी दवाखाने या सेवेत येत आहेत. या रुग्णालयांनी प्रति लस १५० शुल्क भरून जिल्हा आरोग्य विभागाकडून लस घ्यायची आहे. लस घेणाऱ्यांकडून मात्र २५० शुल्क घ्यायचे आहे. यातील १०० रुपये रुग्णालयास व्यवस्थापन खर्च मिळणार आहे. यातून या दवाखान्यांनी लसीकरणाचे साहित्य व कर्मचाऱ्यांचा खर्च भागवायचा आहे.
लस दिल्यावर होणार नोंद
खासगी रुग्णालयात लस देताना आधार व ओळखपत्रावरून संबंधित व्यक्तीची पोर्टलवर नोंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पोर्टलवर नोंद नसलेल्या व्यक्ती थेट लस घेण्यास खासगी रुग्णालयात जाऊ शकतात. त्याचबरोबर ज्येष्ठ व कोमोर्बीड व्यक्तींची पोर्टलवर नोंद नसली तरी ते थेट जवळच्या सरकारी रुग्णालयात लस घेण्यासाठी जाऊ शकतात. पहिल्या दिवशी पोर्टल लवकर सुरू न झाल्याने लसीकरणाला अडचण आली. दुपारनंतर पोर्टल सुरू झाल्यावर लसीकरण सुरू झाले.
फक्त यांनाच मिळेल मोफत लस
खासगी व सरकारी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना तर यापूर्वीपासून माेफत लस देण्यात येत आहे. आता ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपुढील कोमार्बीड नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे. याखेरीज ज्यांना लस हवी असेल त्यांना २५० रुपये शुल्क भरून खासगी दवाखान्यात लस घ्यावी लागणार आहे. पहिल्या दिवशी पोर्टल बंद असल्याने एकाही दवाखान्याला शुल्क भरून आरोग्य विभागाकडून लस घेता आलेली नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.
पहिल्या टप्प्यातील अडीच हजार बाकी
पहिल्या टप्प्यात ३० हजार १८४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. २६ फेब्रुवारीच्या सत्राअखेर पहिल्या टप्प्यातील २७ हजार ४९८ जणांनी लस घेतली आहे. अद्याप यातील २ हजार ६८६ जणांना लस देणे बाकी आहे. आजार व इतर कारणांमुळे या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नव्हती. हळूहळू सर्वजण लस घेण्यासाठी येत आहेत. पहिली लस घेतलेल्यांपैकी ५ हजार २६४ जणांनी दुसरा डोसही घेतला आहे.
लस घेताना थेट नोंदणी
केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना यापूर्वी लस देण्यात आली, पण आता ज्येष्ठ नागरिक, कोमोर्बीड व इतर नागरिकांना सरकारी दवाखान्यात मोफत किंवा खासगी रुग्णालयात शुल्क भरून लस घेण्यासाठी थेट जाता येणार आहे. लस घ्यायला गेल्यावर संबंधित दवाखान्यातील आरोग्य कर्मचारी आधारकार्डावरून पोर्टलवर नोंदणी करणार आहेत. त्यामुळे लस घेण्यास आता पूर्वनोंदणीची अट नाही.
या ठिकाणी मिळणार कोरोना लस
सरकारी रुग्णालये खासगी रुग्णालये
- १) सिव्हिल हॉस्पिटल मार्कंडेय
- २) दाराशा दवाखाना लोकमंगल
- ३) मंद्रुप, ग्रामीण रुग्णालय अश्विनी, कुंभारी
- ४) पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय जनकल्याण
- ५) बार्शी ग्रामीण रुग्णालय जगदाळेमामा