टेंभुर्णी : दहा दिवसांत शेख कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने बळी घेतला. हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरातील कर्ती माणसे गेल्याने दीड वर्षाची मुलगी, नवजात मुलगा अनाथ झाला आहे. आता घरात या साऱ्यांचा पालनकर्ता म्हणून भय्या शेख हा धडपडत आहे.
मृत व्यक्तींचा स्कोअर उपचारादरम्यान फक्त एक होता. घरातील पाच लोकांना जीव गमवावा लागला आहे, हे आरोग्ययंत्रणा व प्रशासनाचे अपयश असल्याचा आरोप पाणावलेल्या डोळ्यांनी भय्या शेख याने केला.
एप्रिल व मे या दोन महिन्यांत टेंभुर्णी शहर व परिसरातील अनेकांचा कोरोनाने बळी घेतला. शेख कुटुंबीयांचे दुःख शब्दांत वर्णन करण्यासारखे नाही. २७ एप्रिल ते ६ मे या १० दिवसांत या एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे.
एप्रिल महिन्यातील २० तारखेला शेख कुटुंबाचे प्रमुख हनिफ मौला शेख हे कोरोनाबाधित झाले. २१ तारखेला घरातील सर्वच सदस्यांची टेस्ट केली असता दुसऱ्या दिवशी कुटुंबातील सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. लगेच उपचार सुरू केले. २६ एप्रिलला हनिफ शेख (वय ६८) यांना बार्शी येथे ॲडमिट केले. त्यांना ऑक्सिजन लावण्याची गरज नव्हती. परंतु, २७ एप्रिल रोजी त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले. ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. इंजेक्शन दिल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. तासाभरातच त्यांचा मृत्यू झाला.
या काळात शेख कुटुंबातील भय्या हनिफ शेख हा तरुण पॉझिटिव्ह असतानाही एकाकी लढत जबाबदाऱ्या पार पाडत होता. तोही मृत्यूच्या दाढेतून परतला. वडील, आई, भाऊ व पत्नी यांचे मृत्यू डोळ्यांदेखत पाहून त्याच्यावर आभाळच कोसळले.
भय्या शेख यातून अद्याप सावरलेला नाही. पत्नीच्या मृत्यूमुळे दीड वर्षाची मुलगी आईविना अनाथ झाली. भावाच्या मृत्यूनंतर सात दिवसांनी जन्मलेला त्याचा मुलगा व पत्नी यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे.
या साऱ्यांची जबाबदारी भय्या शेख याच्यावर आली आहे. वडील, आई, सावत्र आई, भाऊ व पत्नी ही घरातील सर्व कर्ती माणसे गेल्याने भय्या शेख मानसिकदृष्ट्या खचला आहे.
----
अर्ध्या तासाच्या फरकाने माय-लेकरं गमावली
१ मे रोजी पत्नी ईल्लला हनिफ शेख (६१) यांचा मृत्यू झाला, तर ५ मे रोजी रुक्साना हनिफ शेख (५५) व इक्बाल हनिफ शेख (३१) या मायलेकरांचा अर्ध्या तासाच्या फरकाने इंदापूर येथे मृत्यू झाला. ६ मे रोजी अर्जिया भय्या शेख (वय २४) यांचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दहा दिवसांतच शेख कुटुंबातील पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आणि हे कुटुंब उघड्यावर आले.
---