फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला आणि सर्वांचा जीव टांगणीला लागला. दररोज गावोगावी, शहरी भागात रुग्णसंख्या वाढतच चालल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. सांगोला शहर व ग्रामीण भाग, आजूबाजूच्या तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी सांगोल्यातील आठ कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत.
कोरोनाबाधित दुर्धर आजाराने बळावलेले, ऑक्सिजनअभावी किंवा उपचाराला प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देता त्यांच्यावर शासकीय नियमानुसार अंत्यविधी केला जात आहे. दरम्यान, सांगोल्यातील कोविड हॉस्पिटलकडून राज्य शासन आरोग्य विभागाच्या नियमावलीचे पालन करून मृतदेहाला व्यवस्थित पॅकिंग करून शववाहिकेतून स्मशानभूमीत पोहोच केला जातो. त्या ठिकाणी सांगोला नगर परिषदेचे कोरोना योद्धे पीपीई किट घालून कोरोनाबाधित मृतदेहावर त्यांच्या धर्मानुसार अंत्यविधी करीत आहेत.
अंत्यविधीसाठी पाच पथकांची नेमणूक
सांगोला नगर परिषदेकडून मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य निरीक्षक संजय दौंडे यांच्या नियंत्रणाखाली कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी चार कर्मचाऱ्यांची पाच पथकांची नेमणूक केली आहे. कोविड हॉस्पिटलमधून अधिकाऱ्यांना अंत्यविधीसाठी फोन येतो. त्यानंतर कोरोना योद्धे सुरक्षा साधने घालून मृतदेहावर त्यांच्या धर्मानुसार अंत्यविधी अगर दफन करण्याचे पवित्र काम करीत आहेत.
हे आहेत कोरोना योद्धे
सांगोला नगर परिषदेचे वैभव भोरखडे, तानाजी मेटकरी, अनिकेत चंदनशिवे, हर्षद बनसोडे, सनी बाबर, अशोक बनसोडे, अश्वजित माने, लखन बनसोडे, गणेश गळीयल, संजय गावडे, सोमनाथ बनसोडे, नीलेश कांबळे, संतोष चांडोले, महादेव जानकर, निशांत गळीयल, सिद्धेश्वर बनसोडे, गौतम बनसोडे, सतीश बनसोडे, प्रफुल्ल धनवडे, युवराज बनसोडे हे कोरोना योद्धे म्हणून काम पाहत आहेत.
फोटो ओळ ::::::::::::::::
सुरक्षा साधने घालून स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यविधी करताना कोरोना योद्धे.