सांगोला : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. गाव, वाड्या-वस्तीवरील घराघरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मात्र, सांगोला तालुक्यातील तब्बल २३ गावे, वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांनी कोरोनाला वेशीवरच रोखल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
सद्यस्थितीत सांगोला शहर व तालुक्यातील ८० गावे, वाड्या-वस्तींवरील ९०२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एप्रिल महिन्यात सांगोला तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागासह वाड्या-वस्त्यांवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शनिवारपर्यंत झालेल्या ६४१ जणांच्या तपासणीमध्ये ८१ पॉझिटिव्ह रूग्ण तर ५४३ निगेटिव्ह आढळले. त्यापैकी २५८ ॲक्टिव्ह रूग्ण असून, १७१ रुग्णांवर ८ कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही एकमेव गुणापवाडी कोरोनामुक्त आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात अजूनही कोरोनासंबंधी सतर्कता बाळगली जात नसल्यामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र, सोयी-सुविधांअभावी आरोग्य यंत्रणेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोरोनामुक्त असलेली गावे
सांगोला शहर व तालुक्यातील १०३ गावांपैकी सातारकरवाडी, बंडगरवाडी, जाधववाडी, करांडेवाडी, डिकसळ, नराळे, हबीसेवाडी, हणमंतगाव, गळवेवाडी, खारवटवाडी, शिवणे, मेटकरवाडी, तिप्पेहाळी, हटकर मंगेवाडी, गुणापवाडी, मिसाळवाडी, झापाचीवाडी, कोंबडवाडी, काळूबाळूवाडी, कारंडेवाडी, सरगरवाडी, बंडगरवाडी, नलवडे वस्ती या २३ गावे, वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांनी कोरोनाला वेशीवर रोखून काळजी घेतली आहे.
कोट :::::::::::::::::
कोरोनापासून दूर असलेली २३ गावे, वाड्या या मुख्य शहरापासून दूर आहेत. लोकसंख्येने कमी आणि कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. आजही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासनाने लागू केलेले कडक निर्बंध व संचारबंदीची तितकीच प्रभावी अंमलबजावणी ही गावे, वाड्या करत आहेत.
- संतोष राऊत
गटविकास अधिकारी, सांगोला
कोट :::::::::::::
सध्या कोरोनाचा वेगाने प्रसार होत असताना सांगोल्यातील २३ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, यासाठी त्या गावातील ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन! या गावांचा आदर्श इतर गावांनी घेऊन आपापली गावे कोरोनापासून दूर ठेवून काळजी घ्यावी.
- दत्तात्रय भरणे, पालकमंत्री